
उद्धव ठाकरेंचा आरोप; “डीलिमिटेशन म्हणजे मतचोरीचाच विषय संसदेत उघडपणे आणला जातो आहे”
लोकसभेत जे विधेयक मांडलं जाणार आहे त्या विधेयकामुळे संपूर्ण देशाला त्रास होणार आहे. मलाही या डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देता आला असता. पण मी पक्षाच्या हितापेक्षा देशहिताला जास्त महत्त्व देतो.
अनेकांनी मतं व्यक्त केली आहेत. शिवसेनेने विरोध करण्याची भूमिका का घेतली? तर पहिलं कारण म्हणजे हे ठरवण्याचा ज्यांना अधिकार दिलाय ती समिती. या समितीत जे लोक आहेत त्यांच्यावर मतचोरीचा आरोप झाला आहे. ज्ञानेश कुमार या समितीवर आहेत. तीन जणांची समिती आहे ज्यात ज्ञानेश कुमार आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत, त्यांचं नाव माहीत नाही पण त्यांची नियुक्ती मोदी आणि शाह यांनीच केलेली आहे. तर तिसऱ्या व्यक्तीची नियुक्ती ज्ञानेश कुमार करणार म्हणजे यात विरोध करण्यासारखं काही उरलंच नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोध का दर्शवला आहे ती भूमिका स्पष्ट केली.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधी कुणाचं मत घेतलं गेलं नाही. समिती हा फार्स आहे, काय करायचं आहे त्याची स्क्रिप्ट तयार आहे, त्याच्यावर सह्या करून जनतेसमोर आणायची एवढंच काम उरलं आहे. या समितीत कोण असलं पाहिजे? तर त्यात सरन्यायाधीश होते, एक मंत्री होते आणि विरोधी पक्षनेता असं तिघांचं पीठ जर का धरलं असतं तर गोष्टी वेगळ्या असत्या. त्यामुळे मतचोरी उघडपणे झाली आहे. ज्यांचा मतचोरीचा अनुभव आहे असेच लोक समितीवर आहेत. त्यामुळे आमचा विरोध आहे. त्यांच्याप्रमाणे मम म्हणणारेच निवृत्त न्यायाधीश समितीवर असणार आहे. शिवाय जे सीमांकन होईल त्यात लोकसभेच्या जागा वाढवल्या जाणार आहेत. राज्यसभेच्या जागा वाढतील असं नाही. सीमांकन हीच समिती करणार. कशी करणार? २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही अनुभव घेतला आहे. भाजपाने देशाचा असा अभ्यास केला आहे की महापालिका, विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या याद्यांचा अभ्यास केला आहे. कुठली यादी कुणाला जास्त मतं देते हे पाहिलं आहे. भाजपाला पडणारी मतं आणि विरोधी पक्षांना पडणारी मतं याची यादी यांच्याकडे तयार आहे, काही मतदारसंघ असे वेगळे केले जातील जिथे कुणी काहीही प्रचार केला तरीही भाजपालाच मतं मिळतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
डीलिमिटेशन म्हणजे उघड उघड मतचोरीचाच विषय संसदेत आणल्या जात आहेत. कुणी म्हणेल महाराष्ट्राच्या ४८ जागांच्या ऐवजी ७२ होत आहेत, तमिळनाडूच्या ३९ आहेत त्या वाढत आहेत. ७२ जागा उत्तर प्रदेशच्याही ५० टक्के जागा वाढणार आहेत ज्यानंतर आपल्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये आत्ता जो ३२ जागांचा फरक आहे तो ४८ जागांचा होणार आहे हे कुणाच्या लक्षात आलं आहे का? तसंच तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश मध्ये जो फरक आहे तोपण मोठा आहे. २० जागा त्यांच्या अधिक होणार आहेत. तमिळनाडूच्या जागा वाढल्या तरीही जागांचा हा फरक लक्षात घेतला पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. देशातल्या सर्वाधिक कर देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. त्याचा परतावा महाराष्ट्राच्या हितासाठी मिळत नाही. पण महाराष्ट्राचा गळा दाबला जातो आहे त्याचं काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसंच हे कसलं देशहित आहे? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. महिला विधेयक यात आणू नका, महिला विधेयक आत्ता वेगळं करून आणा मी पाठिंबा देतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना आणि सगळ्याच खासदारांना सांगू इच्छितो आहे आत्ता खोक्यांकडे पाहू नका, उद्या तुमच्याकडे कचऱ्याची पेटी येईल. कचरा पेटीत जायचं नसेल तर या बिलाला विरोध करावा. आता शिवसेनेचे जे ९ खासदार आहेत त्यांना आम्ही पक्षादेश दिला आहे. त्यानुसार ते मतदान करतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.




