एड्स नियंत्रणातील उल्लेखनीय कामगिरी; रत्नागिरी जिल्ह्याचा दिल्लीत होणार राष्ट्रीय सन्मान!

‘९५-९५-९५’ उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता; १ डिसेंबरला जागतिक एड्स दिनानिमित्त गौरव

रत्नागिरी : एचआयव्ही/एड्स नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एड्स सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत निश्चित करण्यात आलेली ९५-९५-९५ ही उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करत रत्नागिरी जिल्ह्याने ‘सुरक्षित’ दर्जा प्राप्त केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे जिल्ह्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहसचिव ऋतू शर्मा यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे. ‘मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी आणि संपूर्ण जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

एचआयव्ही/एड्समुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या स्मृतींना हा सन्मान समर्पित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी यांच्यासह संपूर्ण पथकाने दिलेल्या योगदानाची दखल या निमित्ताने घेतली जाणार आहे.

नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे १ डिसेंबर रोजी होणाऱ्या जागतिक एड्स दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने केलेल्या या कामगिरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button