
महावितरण कर्मचाऱ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न, लॅपटॉपची तोडफोड, कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
रत्नागिरी २८:- नवीन वीज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या एका व्यक्तीने महावितरणच्या जाकादेवी (चाफे) शाखा कार्यालयात अक्षरशः धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत लॅपटॉपची तोडफोड करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने चाकूने कर्मचाऱ्याच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्याने वेळीच प्रतिकार केल्याने मोठा अनर्थ टळला. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




