चंदा आईस्क्रीमचे संस्थापक, निवृत्त प्राध्यापक विजय केळकर यांचे निधन


रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील माजी प्राध्यापक विजय गजानन केळकर (वय ८०) यांचे शनिवार (२८ नोव्हेंबर) दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील राजेंद्र नगर येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

मूळचे नागपूरचे असलेले केळकर कॉमर्स कॉलेजसाठी रत्नागिरी येथे येऊन स्थायिक झाले. त्यांनी सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ अध्यापन केले. जाहिरातकला या विषयावर त्यांनी लिहिलेले पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लावण्यात आले होते. कॉलेजच्या कॉमर्स विभागाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. केळकर सरांची शिकवण्याची शैली, अंदाज वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षात राहण्यासारखा होता. त्यांचा कॉमर्स शिवाय संगीत, कला-नाटक, चित्रपट, क्रीडा यांचाही व्यासंग होता. त्यांच्याकडे उद्योजकता होती. त्यांनी चंदा आईस्क्रीम नावाने आईस्क्रीम उत्पादनाचा व्यवसाय सुरू करून नावारूपास आणला. तसेच त्यांनी सुरू केलेले विठ्ठल मंदिराजवळील राजा आईस्क्रीम पार्लर युवकांमध्ये विशेष प्रसिद्ध होते.

वयाच्या ५० व्या वर्षी १९९५ साली त्यांनी कॉलेजमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यावेळी शिक्षण क्षेत्रात रत्नागिरीत प्रथमच मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी सोसायटीला भरघोस देणगी दिली. केळकर यांनी देहदान संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचा देह रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी केळकर, मुलगा विक्रांत, मुलगी मधुचंदा असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button