
लांजा-राजापूरच्या शेती विकासासाठी आमदार किरण सामंत यांची कृषी विद्यापीठाला भेट
माती परीक्षण, फळबागांचे पुनरुज्जीवन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापरावर तज्ज्ञांशी चर्चा
राजापूर : लांजा आणि राजापूर तालुक्यांतील शेतीचा विकास साधण्याबरोबरच माती परीक्षणाला प्रोत्साहन देणे आणि पारंपरिक फळबागांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी आणि कृषी तज्ज्ञांशी विविध कृषीविषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
लांजा आणि राजापूर तालुक्यांना शेती व फळबागांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या भागातील भौगोलिक परिस्थिती, मातीचा पोत आणि हवामानाचा विचार करून शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर यावेळी भर देण्यात आला. विशेषतः आंबा, काजू यांसारख्या पारंपरिक फळपिकांच्या बागांचे योग्य व्यवस्थापन, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आणि जमिनीच्या आरोग्यानुसार पीक नियोजन या विषयांवर चर्चा करण्यात आली.
माती परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीतील पोषक घटकांची अचूक माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्यास खतांचा संतुलित वापर करणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतीची उत्पादकता वाढविणे शक्य होईल. त्यामुळे लांजा व राजापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाबाबत जागृती निर्माण करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
कृषी विद्यापीठातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन थेट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ आणि स्थानिक शेतकरी यांच्यात समन्वय वाढविण्याबाबतही विचारविनिमय झाला. कोकणातील पारंपरिक फळबागांचे संवर्धन करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास स्थानिक शेतीला नवी दिशा मिळू शकते. त्यातून लांजा व राजापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचा या भेटीमागील प्रमुख उद्देश होता.
यावेळी विद्यापीठ अभियंता राहुल घाडगे, शिक्षण संचालक डॉ. नारखेडे, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजय राणे, डॉ. एस. डी. देसाई, वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अरुण माने, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उद्योजक सचिन पाकळे आदी उपस्थित होते.




