सॉ मिलच्या आवारात गांजाची लागवड; २० वर्षीय तरुणाला ताब्यात

‘मिशन फिनिक्स’अंतर्गत एलसीबीची धडक कारवाई; १ लाख ३८ हजारांचा गांजा जप्त

चिपळूण : पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे धडक कारवाई करत सॉ मिलच्या आवारात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ किलो ५३२ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून, त्यांची किंमत १ लाख ३८ हजार ३०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बुधवारी (२५ नोव्हेंबर) रात्री सुमारे ९.०५ वाजता पिंपळी खुर्द परिसरात बेकायदेशीर गांजाची लागवड सुरू असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल सॉ मिलच्या आवारात एनडीपीएस कायद्यान्वये छापा टाकला.

यावेळी सॉ मिलमधील कामगारांच्या निवासासाठी असलेल्या खोलीत राहणारा अभय प्रदीप पांडे (वय २०, मूळ रा. अयोध्या, उत्तर प्रदेश) हा तरुण गांजाच्या वनस्पतींची विनापरवाना लागवड व जोपासना करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड केल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून, पंचांसमक्ष पोलिसांनी गांजाची झाडे जप्त केली.

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चिपळूण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे तसेच चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button