आंबाघाटात सुमारे सात किलोमीटर लांबीचा भव्य सहापदरी बोगदा उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे


आंबाघाटात सुमारे सात किलोमीटर लांबीचा भव्य सहापदरी बोगदा उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेल्या तीन पर्यायी आराखड्यांपैकी (अलाइनमेंट) कोणत्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळते, याची प्रतीक्षा आहे.सध्या आंबाघाटातील रस्ता अनेक ठिकाणी निमुळता, तीव्र वळणांचा आणि पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्यादृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या घाटाला वळसा घालून प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी या बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित बोगदा हा तब्बल सात किलोमीटर लांबीचा, सहापदरी आणि साडेपाच ते सहा मीटर उंचीचा असणार आहे. यामुळे भविष्यातील अवजड वाहतुकीची कोंडी पूर्णपणे टळणार आहे.महामार्ग प्राधिकरणाकडून या बोगद्याच्या उभारणीसाठी तीन वेगवेगळ्या ‘अलाइनमेंट’चे (मार्गाचे नकाशे) प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाकडे सादर केले आहेत. भौगोलिक रचना, पर्यावरणीय परिणाम आणि तांत्रिक बाबींचा विचार करून हे तीन पर्याय देण्यात आले आहेत. या तीन प्रस्तावांपैकी नेमक्या कोणत्या अलाइनमेंटला हिरवा कंदील मिळतो, यावर या प्रकल्पाची पुढील दिशा ठरणार आहे.आंबाघाटातील हा बोगदा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि तितकाच खर्चिक आहे. मोठ्या खर्चाचा हा प्रकल्प असल्याने केंद्रीय मंत्रालय याला तत्काळ मंजुरी देते का, की निधीच्या तरतुदीनुसार प्रस्तावात काही बदल केले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुजोरा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button