मराठी चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्करच्या शर्यतीत; १०४ चित्रपटांच्या यादीत मिळवले स्थान!


ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री ठरलेला ‘गोंधळ’ (Gondhal) हा चित्रपट ९९ व्या अकादमी पुरस्कारमध्ये ‘आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म’ (International Feature Film) श्रेणीसाठी पात्र ठरला आहे, अशी घोषणा ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने मंगळवारी केली.

‘गोंधळ’ने १०४ चित्रपटांच्या यादीत मिळवले स्थान

यानुसार या श्रेणीसाठी पात्र ठरलेल्या १०४ चित्रपटांच्या यादीत गोंधळ या मराठी चित्रपटाचा समावेश झाला आहे. मात्र, या यादीत स्थान मिळाल्याचा अर्थ चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाली किंवा त्याला नामांकन मिळाले, असा होत नाही. तर, पुरस्काराच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी हा सिनेमा पात्र ठरला आहे.

महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ विधी आणि लोककला परंपरेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. २०२५ मध्ये झालेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांना सिल्व्हर पीकॉक पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

गोंधळ सिनेमाची गोष्ट ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. गोंधळ हा पारंपरिक विधी, संगीत, नृत्य, पौराणिक कथा आणि धार्मिक परंपरा या सगळ्यांचे मिश्रण असलेली गोष्ट आहे.

सिनेमात सुमन नावाच्या महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. आनंद या श्रीमंत व्यक्तीशी तिचे लग्न झालेले असते; मात्र ती तिच्या संसारात सुखी नसते. सुमन एका गोंधळी कलाकाराच्या प्रेमात पडते. त्यानंतर ती त्या लग्नातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. यामध्ये इतर काही व्यक्ती सहभागी होतात. पुढे ही गोष्ट हत्या, फसवणूक, प्रेम आणि जगण्यासाठीच्या संघर्षाभोवती फिरते.

या चित्रपटात इशिता देशमुख, किशोर कदम, योगेश सोहोनी, निषाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दरम्यान, ९९ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी निवडक विभागांमधील प्राथमिक मतदान ७ ते ११ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी शॉर्टलिस्ट जाहीर केली जाईल. ऑस्कर नामांकनांची घोषणा २१ जानेवारी २०२७ रोजी होणार असून, पुरस्कार सोहळा १४ मार्च २०२७ रोजी ओव्हेशन हॉलिवूड (Ovation Hollywood) येथील ‘डॉल्बी थिएटर’ (Dolby Theatre)मध्ये पार पडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button