चिपळूणमध्ये ६ कोटी ८३ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते तीन कामांचा शुभारंभ; रस्ते आणि पुलांच्या कामांचा समावेश

चिपळूण : चिपळूण परिसरातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून मंजूर झालेल्या ६ कोटी ८३ लाख रुपयांच्या तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये चिपळूण-गुहागर बायपास रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १ कोटी ९१ लाख रुपये, पिंपळी-नांदिवसे रस्ता सुधारणा व डांबरीकरणासाठी ९२ लाख रुपये, तर पेढांबे येथील मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या तीनही विकासकामांमुळे संबंधित भागातील रस्ते वाहतूक अधिक सुकर होण्याबरोबरच दळणवळणाच्या सुविधांना चालना मिळणार आहे. विशेषतः पेढांबे येथील पुलाच्या पुनर्बांधणीमुळे परिसरातील नागरिकांची महत्त्वाची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्यावेळी सभापती सूर्यकांत खेतले, नगरसेवक शुभम पिसे, शशिकांत मोदी, निहार कोवळे, राणी महाडिक, वैशाली कदम, अंजली कदम, नीलम जाधव, यांच्यासह माजी सभापती शौकत मुकादम, राष्ट्रवादीचे नेते जयद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, आशिष खातू, बळीराम मोरे, दादा साळवी, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, संदेश आयरे, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विकास कामांच्या माध्यमातून चिपळूण परिसरातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button