दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर & रिसर्च’ दापोली संस्थेला आदर्श सामाजिक संस्था राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

दापोली : वन्यजीवांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या दापोली येथील वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर & रिसर्च या संस्थेच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड फॉर नेचर भारत, रत्नागिरी जिल्हा शाखा यांच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित निसर्ग मित्र मेळावा व दुसरा राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ मध्ये या संस्थेला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दापोली तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था साप, बिबट्या, माकड, घुबड,कासव अशा विविध वन्यजीवांना वाचवण्याचे काम करत आहे. जखमी, आजारी वन्यजीवांवर उपचार करून त्यांना पुन्हा निसर्गाच्या कुशीत सोडण्याचे मोलाचे कार्य संस्थेचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून करत आहेत. केवळ रेस्क्यूच नव्हे, तर शाळा, महाविद्यालये आणि गावागावांत जाऊन वन्यजीवांबद्दल जनजागृती करण्याचे कामही संस्थेने सातत्याने केले आहे.
या सोहळ्याला जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमी, वनविभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या या कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी, “मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी दापोलीची ही संस्था आदर्श काम करत आहे,” अशा शब्दांत कौतुक केले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या सर्व सदस्यांचे दापोलीकरांकडून अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली असून, यापुढेही वन्यजीव रक्षणाचे काम अधिक जोमाने करू, अशी भावना संस्थेच्या पदाधिकारी यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button