
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानासाठी १० अशासकीय सदस्यांची नियुक्ती,रत्नागिरीचे परशुराम प्रभाकर उर्फ दादा ढेकणे यांचा समावेश
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने १० अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम प्रभाकर उर्फ दादा ढेकणे यांचा समावेश करण्यात आला आहे.
महसूल विभागाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार अभियानाच्या यशस्वी व प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती सदस्यांशी समन्वय साधणे, अभियानाच्या नियोजन व आयोजनाबाबत राज्य समन्वयकांना वेळोवेळी अवगत करणे, तसेच जिल्ह्याच्या प्रभारी यांच्या निर्देशानुसार अभियानाच्या यशस्वितेसाठी कार्यवाही करणे, अशी जबाबदारी नियुक्त अशासकीय सदस्यांवर सोपविण्यात आली आहे.
तसेच खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य तसेच सरपंच यांच्याशी संपर्क साधून अभियानात त्यांच्या सहभागाची खात्री करणे आणि अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासनाला सूचना करणे, अशीही जबाबदारी सदस्यांना देण्यात आली आहे.
या समितीत संजय कल्याण कोंडगे (नांदेड), अरविंद पाटील निलंगेकर (लातूर), नितीनकुमार सुरेशचंद्र भुतडा (यवतमाळ), संजय गजानन गाते (वर्धा), वासुदेव शंकरराव काळे (पुणे), जगदीश तुकाराम मुळीक (पुणे), प्रकाश कृष्णा निकम (पालघर), परशुराम प्रभाकर ढेकणे (रत्नागिरी), भानुदास रत्न वेडू (अहिल्यानगर) आणि बबनराव बाबाजी चौधरी (धुळे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील परशुराम प्रभाकर ढेकणे यांचा राज्यस्तरीय समितीत समावेश झाल्याने जिल्ह्याच्या महसूलविषयक प्रश्नांना तसेच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




