चिपळुणातील प्रचंड आवाज करणारा ‘तो’ कॉम्प्रेसर महिनाभरात हटवणार!

प्रथमेश अपार्टमेंटमधील नागरिकांना मोठा दिलासा; नगरसेविका अंजली कदम, नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या प्रयत्नांना यश

चिपळूण : महानगर गॅसच्या कॉम्प्रेसरमधून होणाऱ्या प्रचंड आवाजामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या प्रथमेश अपार्टमेंट परिसरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महानगर गॅस प्रशासनाने हा आवाज करणारा जुना कॉम्प्रेसर महिनाभरात स्थलांतरित करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे नगरसेविका अंजली कदम आणि नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

महानगर गॅसच्या कॉम्प्रेसरमधून होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता. याबाबत प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका अंजली कदम आणि नगरसेवक शशिकांत मोदी यांनी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून पत्रव्यवहाराद्वारे कॉम्प्रेसर स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. तीन ते चार महिन्यांपूर्वी नागरिकांना सोबत घेऊन दोन वेळा महानगर गॅसच्या परिसरात ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते.

या आंदोलनानंतर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कॉम्प्रेसर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही काळानंतर पुन्हा कॉम्प्रेसर सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची नागरिकांची तक्रार होती.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी चिपळूण नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत चिपळूणमध्ये आले असताना नगरसेविका अंजली कदम यांनी त्यांच्याकडे या समस्येची व्यथा मांडली. याची तातडीने दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी गेल्या रविवारी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना १५ दिवसांची मुदत देत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी संजय जाधव, वैभव निवाते आणि नगरसेविका अंजली कदम यांच्यासमवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. यावेळी नवीन ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी आवाज करणारा कॉम्प्रेसर बसविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सध्या नागरिकांना त्रासदायक ठरत असलेला जुना कॉम्प्रेसर महिनाभरात स्थलांतरित करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. याबाबत तांत्रिक पथकाची बैठक घेऊन स्थलांतराचा निश्चित कालावधी कळविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

मात्र, नवीन ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या कॉम्प्रेसरमुळे पुन्हा आवाजाची समस्या निर्माण झाल्यास महानगर गॅस स्टेशनवर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता महानगर गॅस प्रशासन प्रत्यक्षात किती लवकर कार्यवाही करते, याकडे प्रथमेश अपार्टमेंट परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button