
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ अर्ज करण्यास २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांची माहिती
रत्नागिरी, दि. १६ ): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ (सन २०२४-२५ व २०२५-२६) साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास शासनाने १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता इच्छुक खेळाडू व मार्गदर्शकांना १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९:५९ वाजेपर्यंत) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
सुरुवातीला या पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, दिवाळी सणाच्या सुट्ट्या आणि अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन, दिव्यांग खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत क्रीडा विभागाने ही मुदतवाढ जाहीर केली आहे.
कोणत्या पुरस्कारांसाठी अर्ज करता येतील?
शासन निर्णयाच्या सुधारित नियमावलीनुसार (२०२३) खालील प्रवर्गांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत:
- जीवन गौरव पुरस्कार: क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षींसाठी.
- उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार: पुरुष व महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी.
- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार: खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमात सहभागी झालेल्या खेळाडू/व्यक्तींसाठी.
अर्ज कुठे व कसा करावा?
इच्छुक पात्र उमेदवारांनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फक्त ऑनलाइन प्रणालीद्वारेच अर्ज सादर करायचे आहेत. संकेतस्थळावरील ‘ताज्या घडामोडी’ या विभागात “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” या लिंकवर क्लिक केल्यास अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडू, दिव्यांग खेळाडू, साहसी क्रीडापटू आणि मार्गदर्शकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन २५ नोव्हेंबरपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.




