सावंतवाडी येथील प्रख्यात कवयित्री आणि प्राध्यापिका डॉ. शरयू कृष्णा आसोलकर यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू


मुंबई- गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात सावंतवाडी येथील प्रख्यात कवयित्री आणि प्राध्यापिका डॉ. शरयू कृष्णा आसोलकर (५९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या अपघातात त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर (४६) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सकाळी सुमारे ७.३० वाजता हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शरयू आसोलकर आणि त्यांचे भाऊ वैभव हे कारमधून रत्नागिरीहून सावंतवाडीकडे जात होते. नांदगाव ओटव फाटा परिसरात अचानक एक गाय कारसमोर आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कार वळवली. मात्र, यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या दुभाजकावर जोरदार आदळली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी चंद्रकांत झोरे यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

जखमींना नांदगाव केंद्राच्या तसेच नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून कणकवली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉ. शरयू आसोलकर यांचा मृत्यू झाला.
डॉ. शरयू आसोलकर या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. अध्यापन क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांनी कवयित्री म्हणूनही साहित्यविश्वात आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक निधनाने शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button