साहित्य संमेलनात साहित्या बरोबरच अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मकतेचा सन्मान व्हावा; राजकारण आणू नये – संमेलनाध्यक्ष डॉ. मंगला वैष्णव

पुणे : साहित्य संमेलने ही केवळ साहित्याची व्यासपीठे नसून अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कलात्मक मूल्यांचा सन्मान करणारी व्यासपीठे आहेत. अशा संमेलनांमध्ये राजकारण आणण्याऐवजी साहित्य आणि संस्कृतीचा गौरव व्हायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका व २१ व्या राज्यस्तरीय कथालेखिका नांदी संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. मंगला वैष्णव यांनी केले.

पेरूगेट येथील भावे हायस्कूलमधील प्र. ल. गावडे सभागृहात १ नोव्हेंबर रोजी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग आणि ‘आम्ही सिद्ध लेखिका संस्था’ यांच्या समन्वयातून आयोजित या संमेलनाचे उद्घाटन मसापच्या कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. छाया महाजन, तर विशेष मान्यवर म्हणून वृंदा दिवाण उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांनी मराठी भाषा, साहित्य, आचार-विचार आणि साहित्यप्रसार याविषयी आपले विचार मांडले.

साहित्यिकांच्या विचारांचा आणि कथांचा जागर

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिका रेखा बैजल यांची प्रा. स्नेहल पाठक यांनी मुलाखत घेत त्यांच्या साहित्यिक योगदानाचा आणि जीवनप्रवासाचा वेध घेतला. कथाकथन सत्रात प्रा. ललिता गादगे यांच्या उपस्थितीत कथा स्पर्धेतून निवड झालेल्या कथालेखिकांनी प्रभावी कथांचे सादरीकरण केले. ‘विविध कथा प्रकारातील कथालेखिकांचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ लेखिका, कादंबरीकार व नाटककार विजया ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पौर्णिमा हुंडिवाले, डॉ. शुभदा खटावकर, ज्योती पुजारी आणि डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर यांनी सहभाग घेतला.

साखळी कथा अभिवाचन सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. लीला शिंदे यांनी भूषविले. या सत्राचे नियोजन कोकण विभाग प्रमुख आणि संस्थेच्या सहसचिव सुनेत्रा विजय जोशी आणि प्रसिद्धी प्रमुख व तंत्रज्ञान समिती सदस्य सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांनी तंत्रज्ञान समिती सदस्या उमा जोशी व स्वानंदी जोगळेकर यांच्या सहकार्याने केले. यावेळी ११ कथांचे समूह अभिवाचन करण्यात आले.

समारोप सत्रात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह अंजली कुलकर्णी यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट करत आगामी शतक महोत्सवी साहित्य संमेलनासाठी उपस्थित लेखिकांना निमंत्रित केले. कार्याध्यक्ष यामिनी पाठक यांनी आभार मानले. महाराष्ट्रातील विविध विभागांसह मध्य प्रदेश आणि कोकणातून २२० हून अधिक कथालेखिकांनी या संमेलनाला उपस्थिती लावली. संस्थेच्या विश्वस्त, सल्लागार, पदाधिकारी आणि पुणे कार्यकारिणीने आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या अध्यक्ष प्रा. पद्मा हुशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे नियोजन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button