पंचतारांकित हॉटेल्समुळे रत्नागिरीत रोजगाराचे नवे पर्व; ६०० ते ७०० स्थानिक तरुणांना संधी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १३ ): जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, शहरात उभारण्यात येत असलेल्या ‘महिंद्रा क्लब’ आणि ‘एक्सप्रेस इन’ या दोन पंचतारांकित हॉटेल्सच्या माध्यमातून सुमारे ६०० ते ७०० स्थानिक तरुणांना रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत. यासोबतच महिला बचत गटांची आर्थिक पिळवणूक रोखणे, ‘सिंधुरत्न समृद्ध योजने’ला गती देणे आणि शाळा बंदच्या अफवांना पूर्णविराम देणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जाहीर केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, माजी आमदार तथा सिंधुरत्न योजनेचे उपाध्यक्ष विनय नातू, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे, शिक्षणाधिकारी मनिषा जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक तरुणांना प्रशिक्षणातून थेट नोकरी
रत्नागिरीतील ‘महिंद्रा क्लब’चे ९० टक्के काम पूर्णत्वास आले असून, हे हॉटेल आणि ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलदेखील सेवेत दाखल होणार आहे. या दोन्ही हॉटेल्समध्ये वेटर, शेफ, हाऊसकीपिंग, ड्रायव्हर आणि मॅनेजर अशा विविध पदांसाठी ६०० ते ७०० मनुष्यबळाची गरज भासणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांना या संधीचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी रत्नागिरीतील ‘स्किल सेंटर’शी (Skill Centre) दोन्ही हॉटेल्सचा सामंजस्य करार करावा आणि स्थानिक तरुणांना योग्य प्रशिक्षण देऊन थेट नोकरीत सामावून घ्यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिले.
मायक्रो फायनान्सच्या मनमानीला बसणार चाप
महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारा त्रास आणि सावकारी पद्धतीने होणारी सक्तीची वसुली प्रशासनाकडून खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा पालकमंत्र्यांनी दिला. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रीयीकृत बँकांनी बचत गटांना कर्ज नाकारू नये, यासाठी बँक अधिकाऱ्यांनाही सक्त सूचना देण्यात आल्या.
‘सिंधुरत्न’मधील विकासकामांचा आढावा
सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या बैठकीत २०२२-२३ आणि २०२४-२५ मधील पूर्ण झालेल्या व प्रगतीपथावरील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
२०२५-२६ मधील नवीन प्रस्ताव परिपूर्ण अंदाजित रकमेसह सादर करावेत आणि शासन निर्णयानुसार त्यांची योग्य-अयोग्यता तपासून जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी अहवाल द्यावा, असे निर्देश डॉ. सामंत यांनी दिले.
लाभार्थ्यांचे स्वतःचे योगदान, बँक कर्ज आणि शासकीय अनुदान यांचा सुसूत्र आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या योजनेतून महिला बचत गटांना दिलेल्या गाड्यांचा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, पर्यटनाला चालना देण्यासाठी भाट्ये येथे आधुनिक बोट टर्मिनल उभारण्यास भरीव निधी दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार नाहीत – पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी शाळा बंद होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. “जिल्हा परिषदेच्या १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असून, असा कोणताही निर्णय झालेला नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व सदस्यांची बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘क्लस्टर’ तयार करण्याची जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button