
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिलासा मिळणार; प्रोत्साहन भत्ता वाढीवर सरकार सकारात्मक
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच दिले.यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर मंत्रालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी या निकषांच्या आधारे प्रोत्साहन भत्ता निश्चित करण्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.राज्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे तसेच गर्भवती मातांचे पोषण आणि आरोग्य यांची काळजी घेण्यासाठी राज्यातील १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० मदतनीस कार्यरत आहेत. त्यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार सेविकांना प्रतिमहा १,५०० ते २,००० रुपये, तर मदतनीसांना ५०० ते १,००० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो.




