
येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा!
Gokul President Election 2026 : गोकुळदूध संघाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे. उद्या (10 नोव्हेंबर) होणाऱ्या अध्यक्ष निवड सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शासननियुक्त संचालकांना थेट इशारा दिला आहे.
शासननियुक्त संचालक उद्याच्या सभेला आले तर ते आत येतील, मात्र बाहेर जाताना परिस्थिती वेगळी असेल, असं वादग्रस्त विधान राजू शेट्टी यांनी केलं. ‘येताना चालत येतील, पण जाताना खांद्यावरून जातील’, असा इशारा त्यांनी दिला.
गोकुळ कार्यालयावर घेराव घालायचा का, असा सवाल करत त्यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं. महायुतीचे नेतेही आपली माणसं आणणार असल्याची माहिती मिळाल्याचं सांगत शेट्टी यांनी दोन्ही बाजूंनी ताकद दाखवण्याची भाषा केली.
‘गोकुळ कोणाच्या बापाचा नाही’
गोकुळ हा कोल्हापूरच्या जनतेच्या मालकीचा आहे, कोणाच्या बापाचा नाही, असं म्हणत राजू शेट्टी यांनी शासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. गुजरातमधून गोकुळवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुजरातची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करत त्यांनी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. नाशिकचं पाणी गुजरातला वळवण्याचा कथित प्रयत्न, हत्तींचा मुद्दा आणि शक्तिपीठ महामार्गाचा संदर्भ देत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.
शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवर आक्षेप
गोकुळच्या निवडणुकीनंतर चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला शेट्टी यांनी विरोध केला. या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा त्यांचा दावा आहे. न्यायालयाने आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी आणि ड्रोनच्या माध्यमातून मोर्चातील गर्दीची पाहणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
उद्याच्या सभेकडे कोल्हापूरकरांचं लक्ष
सरकारच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या संघर्षात न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरचं आंदोलनही सुरू आहे. यापूर्वी 9 नोव्हेंबरला सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राजू शेट्टींसह अनेक नेते आणि दूध उत्पादक सहभागी झाले होते.
आता 10 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता होणाऱ्या अध्यक्ष निवड सभेत नेमकं काय घडतं, शासननियुक्त संचालक सहभागी होतात का आणि न्यायालयाचा निर्णय काय असतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शेट्टी यांच्या विधानानंतर प्रशासनासमोर सभेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हानही निर्माण झालं आहे.




