
गोकुळ’मध्ये महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणाला मिळणार पहिली संधी?
कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आणि दुग्ध व्यवसायात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’च्या (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) अध्यक्षपदाच्या निवडीचा थरार ऐन टप्प्यात आला आहे.बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज पार पडत असून, सत्ताधारी महायुतीने आपला अध्यक्षपदाचा चेहरा निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांचे सुपुत्र रणजित पाटील यांचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे आहे. महायुतीने सत्ता वाटपाचा फॉर्म्युलादेखील निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
गोकुळच्या निवडणुकीत २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील समविचारी आघाडीने १३, तर महायुतीने १२ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, राज्य सरकारने गोकुळच्या संचालक मंडळावर शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे, प्रशांत भगवान पाटोळे आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील या चौघांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली असून, त्यांना मतदानाचा कायदेशीर अधिकारही बहाल केला आहे. त्यामुळे समविचारी आघाडीला मतदारांनी बहुमत देऊनही सत्तेपासून वंचित राहावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.समविचारी आघाडीने सोमवारी, दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढत महायुती सरकारने शासन नियुक्त संचालकांच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त केला. राज्य सरकारने या निर्णयाद्वारे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा, ठरावधारकांचा विश्वासघात केला असल्याचे टीकास्त्र सोडले.
राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरलेल्या या निवडीसाठी काल रात्री महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुढील काळासाठी सत्ता वाटपाचा ‘सव्वा वर्षाचा फॉर्म्युला’ अंतिम करण्यात आला आहे. ठरलेल्या या नव्या फॉर्म्युल्यानुसार, अध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ (पहिले वर्ष) राष्ट्रवादी काँग्रेसकडे, दुसरे वर्ष भाजपकडे, तिसरे वर्ष शिवसेनेकडे आणि उर्वरित कालावधी जनसुराज्य शक्ती पक्षाकडे असणार आहे.गोकुळचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला गेल्यास माजी आमदार रणजित पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावाची शक्यता आहे. तर, शिवसेना शिंदे गटाला गेल्यास अजित नरके यांचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे. पहिल्या वर्षी भाजपला संधी दिल्यास डॉ. चेतन नरके यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
दरम्यान, याआधीच्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत केवळ समविचारी आघाडीचे १३ संचालक हजर राहिल्याने, १४ संचालकांच्या आवश्यक गणपूर्ती अभावी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी बैठक तहकूब केली होती. आज पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून तब्बल ६०० पोलिसांचा प्रचंड आणि तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




