ज्येष्ठ नागरिकांसोबत न्यायाधीशांनी साजरा केला दीपोत्सव!

आंबये येथील मातोश्री वृद्धाश्रमात दीपदान व दिवाळी फराळाचे वाटप; ज्येष्ठांशी साधला मनमोकळा संवाद

खेड : तालुका विधी सेवा समिती, खेड यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना विविध कायद्यांविषयी तसेच समितीच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आंबये येथील मातोश्री वृद्धाश्रमात दीपोत्सवाचे आयोजन करून ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश वैशाली निरगुडे-पाटील, वरिष्ठ न्यायाधीश श्री. गणेश पाटील तसेच दिवाणी न्यायाधीश श्री. दादासाहेब म्हस्के उपस्थित होते. त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि भावना जाणून घेतल्या.
ज्येष्ठ नागरिकांना कायद्याने मिळालेले अधिकार, त्यांचे संरक्षण, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या तालुका विधी सेवा समितीच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. कायदेशीर अडचणी उद्भवल्यास उपलब्ध असलेल्या विधी सेवा आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी न्यायाधीशांच्या उपस्थितीत दीपदान करण्यात आले. तसेच दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्यासोबत स्नेहपूर्ण वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली.
सण-उत्सवांच्या काळात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीचा सहवास, संवाद आणि आनंदाचे क्षण मिळावेत, या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले. न्यायव्यवस्थेतील अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातील हा स्नेहसंवाद सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button