रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर महिलेला रस्त्यावर रडताना पाहून तो मदतीला धावला खरा, पण एका क्षणात त्या घटनेमुळे त्याचा जीव गेला


-रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील कोतोली फाट्याजीक एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला उभं राहून ओक्साबोक्सी रडणाऱ्या महिलेला मदतीला धावलेल्या एका व्यक्तीचा करुण अंत झाला आहे.ते मदतीला गेले असता त्यांना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोनं जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रमेश भीमराव थोरात (वय ४१, रा. आसुर्ले, ता. पन्हाळा) असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. अपघातानंतर पळून जाणाऱ्या टेम्पोचालकाला महामार्ग पोलिसांनी पाठलाग करून वाघबीळ घाटात ताब्यात घेतलं. करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

नेर्ली-तामगाव येथील एक कुटुंब शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास चारचाकी वाहनाने गणपतीपुळ्याला जात होतं. कोतोली फाट्या जवळ आल्यावर त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलाची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपली चारचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि मुलाला उपचारासाठी कर्ले येथील दवाखान्यात नेले.याच वेळी नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेलेले रमेश थोरात तिथे आले. चारचाकीतील महिला रडत असल्याचे पाहून त्यांनी तत्परतेने त्यांची चौकशी केली आणि त्यांना धीर देत अपघात टाळण्यासाठी ती चारचाकी रस्त्याच्या कडेला घेण्यास मदत केली. मात्र, ते चारचाकीतून उतरत असतानाच कोल्हापूरहून पन्हाळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, रमेश थोरात हे सुमारे पन्नास फूट लांब उडून रस्त्यावर आपटले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण धडकेत चारचाकीच्या दरवाज्याचेही नुकसान झालं. सुदैवाने, चारचाकीतील दोन महिला, एक लहान मुलगा आणि एका वृद्ध व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नाही. मृत रमेश थोरात यांच्या मागे पत्नी, आई, बहीण आणि तीन मुले असा परिवार असून, ते कुटुंबातील एकमेव कर्ते पुरुष होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button