राजापूर तालुक्याचा २० कोटींचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार

१०१ ग्रामपंचायतींमधील ४५९ वाड्यांचा समावेश; विंधन विहिरी, नळपाणी योजना व टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर

राजापूर : शासनाकडून राजापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तालुक्याचा सुमारे २० कोटी रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमधील ४५९ वाड्यांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.

भूजलपातळी आटत चालल्याने नदी-नाल्यांची पात्रे कोरडी पडत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पंचायत समितीने आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे.

या आराखड्यात १५७ विंधन विहिरींसाठी १८८.४ लाख रुपये, १२ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ७.२० लाख रुपये, ३६ विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी १८ लाख रुपये, १३२ नळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी १२६९ लाख रुपये, १६८ विहिरी गाळ काढणे व दुरुस्तीसाठी ११३.४० लाख रुपये, तर ३२ तात्पुरत्या पूरक नळपाणी योजनांसाठी ४०७ लाख रुपये अशी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

अल निनो वादळाच्या प्रभावामुळे यावर्षी तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायत समितीने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे.

पावसाच्या आकडेवारीचा विचार करता गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्जन्यमानात घट झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च या कालावधीत विविध गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील पाच महिन्यांच्या कालावधीत २५ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो, असा प्राथमिक अंदाज आराखड्यात व्यक्त करण्यात आला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांची संभाव्य यादी तयार करून त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.

तयार करण्यात आलेला हा संभाव्य पाणीटंचाई आराखडा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, त्याबाबतची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. मंजुरीनंतर आवश्यक उपाययोजनांना गती मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button