राजीवडा खाडी प्रकरण: खोट्या तक्रारींमुळे मच्छीमारांमध्ये रोष! ८०% काम पूर्ण झालेला ग्राॅयन्स प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची आक्रमक मागणी!!


रत्नागिरीतील राजीवडा खाडी मुखावर सुरू असलेल्या ग्राॅयन्स (दगडी बंधारे) बांधकामावरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळला आहे. एका बाजूला खोट्या तक्रारींमुळे काम थांबवण्याच्या हालचाली सुरू असताना, स्थानिक मच्छीमारांनी या प्रकल्पाच्या बाजूने ठोस भूमिका घेत त्याला शंभर टक्के पाठिंबा दर्शवला आहे. हे ८० टक्के पूर्ण झालेले काम तातडीने पूर्ण न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मच्छीमार संघटनांनी दिला आहे.

प्रशासनाकडे सविस्तर निवेदन

या संपूर्ण प्रकरणी कर्ला मच्छीमार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री. नदीम सोलकर आणि रत्नागिरी मच्छीमार सहकारी सोसायटी (राजीवडा) चे चेअरमन श्री. अन्वर पावसकर यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित प्रशासनाला निवेदन दिले आहे.

हे निवेदन खालील प्रमुख अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे:

मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई
मा. प्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरी
मा. सचिव, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन
तसेच, या निवेदनाची प्रत माहितीस्तव मा. पालकमंत्री श्री. उदयजी सामंत यांनाही पाठवण्यात आली आहे.

तक्रारींमधील दावे फेटाळले

अर्जदारांनी या बांधकामामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा केलेला दावा मच्छीमार नेत्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. भाट्ये बीचवरील धूप (Erosion) थांबवण्यासाठी हा बंधारा अत्यंत गरजेचा असून यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुधारण्यास मदत होणार आहे. खाडीतील काढण्यात येणारी वाळू ही नियमांनुसार समुद्रातील ‘डेसिग्नेटेड डंपिंग साईट’वरच टाकली जात असून यासाठी सर्व कायदेशीर नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स (NOC) घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तांत्रिक अभ्यासाला बांधील प्रकल्प

हा महत्त्वाचा प्रकल्प कोणत्याही तांत्रिक अभ्यासाशिवाय मंजूर झालेला नाही. CWPRS (केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र) आणि आयआयटी मुंबई यांच्या सविस्तर तांत्रिक अभ्यास अहवालानंतरच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. CRZ (किनारी नियमन क्षेत्र) च्या सर्व नियमांचे पालन करून आणि मच्छीमारांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच हे काम सुरू आहे. तसेच, कंत्राट प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून शासकीय नियमांनुसारच ती राबवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मच्छीमारांच्या सुरक्षेचा आणि जीवनाचा प्रश्न
राजीवडा खाडी परिसर हा अधिकृतपणे ‘मच्छीमार गाव’ म्हणून घोषित आहे. येथे ३०० पेक्षा अधिक लहान मोठ्या नौका असून हजारो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. मागील १० वर्षांत खाडी मुखाशी प्रवाहाच्या बदलांमुळे अनेक मच्छीमारांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा ग्राॅयन्स बंधारा पूर्ण झाल्यास हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा आणि सुरक्षेचा प्रश्न सुटणार आहे, असे मच्छीमारांनी सांगितले.

आंदोलनाचा इशारा

या विषयावर दोन्ही सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मच्छीमारांनी तातडीच्या बैठका घेऊन एकमुखी ठराव मंजूर केले आहेत. खोट्या आणि बिनबुडाच्या तक्रारींच्या आधारे ८० टक्के पूर्ण झालेले हे महत्त्वपूर्ण काम थांबवू नये, अशी स्पष्ट मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जर काम थांबवण्याचा प्रयत्न झाल्यास चेअरमन नदीम सोलकर आणि अन्वर पावसकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलनाचा बडगा उगारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button