
खेड एसटी स्थानकातील अस्वच्छतेविरोधात भाजपाचे ‘चिंपाट-टमरेल’ आंदोलन!
ॲड. वैभव खेडेकर यांचा प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम; शौचालयांची स्वच्छता करण्याची मागणी

खेड : एसटी स्थानकातील शौचालयांमध्ये पसरलेली अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, खेडच्या वतीने ‘चिंपाट व टमरेल’ आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपाने एसटी प्रशासनाचे लक्ष प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे वेधले. दरम्यान, शौचालयांच्या स्वच्छतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी संबंधित प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
खेड एसटी स्थानक हे तालुक्यातील ग्रामीण भागासह अन्य ठिकाणी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा होत असलेल्या या स्थानकातील शौचालयांमध्ये अस्वच्छता आणि दुर्गंधीची समस्या निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
प्रवाशांकडून विविध प्रकारचे शुल्क आकारले जात असताना त्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी सुविधा मिळणे आवश्यक आहे. एसटी स्थानकासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची नियमित स्वच्छता राखणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भाजपाने ‘चिंपाट व टमरेल’ हातात घेऊन आंदोलन केले. या आंदोलनातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. एसटी स्थानकातील शौचालयांची तातडीने स्वच्छता करावी, परिसरातील दुर्गंधी दूर करावी आणि प्रवाशांना स्वच्छतागृहांची योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, संबंधित प्रशासनाला हा प्रश्न सोडविण्यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत स्वच्छतेचा प्रश्न मार्गी न लागल्यास पुढील आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही भाजपाच्या वतीने देण्यात आला. त्यामुळे आता एसटी प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि दिलेल्या मुदतीत स्वच्छतेच्या प्रश्नावर कोणती कार्यवाही करते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा रिक्षा युनिट उपतालुकाध्यक्ष संदीप शेंडगे, भाजपा प्रेरित रिक्षा सेल खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, भाजपा रिक्षा युनिट खेड उपतालुकाध्यक्ष तुषार पवार, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, शहर उपाध्यक्षा प्रीती चिखले, शहर चिटणीस आर्या कारेकर, शक्तिकेंद्रप्रमुख वैजेश सागवेकर, शहर सरचिटणीस विजय गुप्ता, शहर चिटणीस अमित खेडेकर, अनिकेत पवार, नंदू शिर्के, तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अक्षय सनगरे, बाळू वर्मा, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाणीपुरवठ्यात दिरंगाई; क्रिस्टल कंपनीच्या कामकाजावर आंदोलकांचा ठपका!
बसस्थानकातील सुलभ शौचालयांच्या स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या खासगी क्रिस्टल कंपनीकडून पाणीपुरवठा करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. तसेच, कंपनीचा सुपरवायझर कामकाजात दिरंगाई करत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. शौचालयांच्या नियमित स्वच्छतेसाठी दोन स्वतंत्र कामगारांची आवश्यकता असताना, त्यासाठी स्वतंत्र कामगारांची नियुक्ती न करता सध्या कार्यरत असलेल्या सफाई कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण टाकला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे बसस्थानकातील शौचालयांच्या अस्वच्छतेला आणि दुर्गंधीच्या समस्येला क्रिस्टल कंपनीचे कामकाज व सुपरवायझरची कार्यपद्धती जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करावा, पुरेसे सफाई कामगार नेमावेत आणि शौचालयांच्या नियमित स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




