
२०१४ नंतर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला मूठमाती : भास्कर जाधव
जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपपासून मराठा आरक्षणापर्यंत विविध मुद्द्यांवर भाजपवर टीका; दुष्काळाकडे दुर्लक्ष करून अधिवेशनाच्या खर्चाची चिंता असल्याचा आरोप
चिपळूण : महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा आणि सभ्यतेच्या परंपरेला २०१४ नंतर मूठमाती देण्यात आली, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केली. पुराव्यांशिवाय आरोप करून सत्ता मिळवण्याचे राजकारण भाजप करत असल्याचा आरोप करत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची ऑडिओ क्लिप, मराठा आरक्षण, गोकुळ दूध संघाची निवडणूक, धमकीचे ई-मेल आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली ३२ मिनिटांची ऑडिओ क्लिप आपण शब्दशः ऐकल्याचे जाधव यांनी सांगितले. विरोधकांना संपवण्यासाठी खोटे नॅरेटिव्ह पसरवले जात असल्याचा आरोप करत खोटे बोलून सत्ता मिळवणे हे भाजपचे तंत्र असल्याची टीका त्यांनी केली. या ऑडिओ क्लिपमधून राजकीय रणनीती उघड झाल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजप मित्रपक्षांनाही अडचणीत आणून त्यांना संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. ‘अमृतवेल ज्या झाडावर चढते, त्याच झाडाला संपवते,’ असे उदाहरण देत त्यांनी भाजपच्या राजकारणावर टीका केली.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदार असूनही भाजपला यश मिळाले नसल्याचे जाधव म्हणाले. या निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या ताकदीला उत्तर दिल्याचा दावा करत, बॅलेट पेपरवर निवडणूक झाली की भाजप हरते, अशी टीका त्यांनी केली. गोकुळ निवडणुकीचा परिणाम विधान परिषद निवडणुकीतही दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जाधव यांनी २०१३-१४ मध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी पहिले प्रयत्न झाल्याचे सांगितले. नारायण राणे यांच्या योगदानाचा उल्लेख त्यांची मुलेही करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नारायण राणे, अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात आरक्षणासाठी महत्त्वाच्या हालचाली झाल्याचा दावा करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा जन्म कधी झाला?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबईच्या महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलमागचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करत जाधव यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांना धमकी दिल्याच्या प्रकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. धमकीच्या प्रकरणांत तथ्य असल्यास तातडीने कारवाई करावी आणि त्यांची सत्यता तपासून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली. एसआयटी प्रकरणाबाबतही संशय व्यक्त करत सरकारने सत्य स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात ४२ कोटी रुपयांची वाढ होणार असल्याच्या मुद्द्यावरून जाधव यांनी सरकारवर टीका केली. राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा अधिवेशनाच्या खर्चाची चिंता असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोणताही अहवाल न घेता ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित केल्याचा दावा करताना रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुके सुरुवातीच्या यादीतून वगळण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर सहा तालुक्यांचा समावेश झाला असला, तरी अद्याप तीन तालुके वंचित असल्याचे ते म्हणाले. शेतीचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची टीकाही त्यांनी केली.
अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सत्ताधारी स्वतःचे पाप लपवण्यासाठी विरोधकांवर टीका करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.




