
“मनोज जरांगे अन् एकनाथ शिंदेंचं नेतृत्व.”; पृथ्वीराज चव्हाणांचं ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर मोठं वक्तव्य!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका कथित ऑडिओ क्लिपवरून राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सध्या राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील, शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मनोज जरांगे-पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व संपवण्याचा हा कुटील डाव आहे’, असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (२४ ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना केला आहे. या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी देखील चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या आरोपाच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “एकतर हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. यातील थोडं जरी काही सत्य असलं तर मग हा महाराष्ट्र कुठे चाललाय हा विचार मनात येतो? एका दगडात अनेक पक्षी मारले जात आहेत. मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व संपवून टाकायचं आणि त्यांनी पैसे स्वीकारून आंदोलन संपवलं असं यामधून दाखवण्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्या बाजूला हे सगळं घडवून आणून त्यांना बदनाम करायचं. त्यांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करायचा असा हा सगळा डाव आहे”, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
“त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ते कलाकार कोण-कोण आहेत ते तुम्हालाही माहिती आहे. प्रत्येकाला स्वाभीमान असतो, त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना किती स्वाभीमान आहे, हे महाराष्ट्राला कळेल. या ५०० कोटींच्या आरोपांच्या क्लिपचं तांत्रिक फॉरेन्सिक विश्लेषण केलं पाहिजे. त्यात कोणाकोणाचे आवाज आहेत ते तपासलं पाहिजे. मग कोणी कोणाला संपवायचा डाव किंवा कोणी कोणाला बदनाम करण्याचा डाव केलेला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंनी काय आरोप केले?
विजयादशमीच्या निमित्ताने नारायण गडावर काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केला. “मला ५०० कोटी रुपये दिले असं तुम्ही भाजपाला सांगितलं आहे का? माझं नाव सांगून तुम्ही दिल्लीतून ५०० कोटी आणले का?” असा सवाल मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना केला होता. “जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत आणि ते ५०० कोटी रुपये तुम्ही घेऊन मला दिले, असं तुम्ही भाजपाच्या नेत्यांना सांगितलंय का? कारण भाजपाचे नेते कुजबुज करत आहेत की जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने ५०० कोटी रुपये पोहोचलेत. जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आहे असं तुम्ही भाजपाला म्हणाले आहात का? तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिले का?”, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना विचारला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप ऐकवली होती.




