
सह्याद्री पॉलिटेक्निकच्या प्रा. हर्षला राजेशिर्के यांच्या संशोधनाला भारत सरकारचे डिझाईन पेटंट
वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान आणि वाढता मानव-प्राणी संघर्ष रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारे ‘ॲनिमल डिटेक्शन अँड मॉनिटरिंग डिव्हाइस’ हे नावीन्यपूर्ण उपकरण विकसित केल्याबद्दल सह्याद्री पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका कु. हर्षला अरविंद राजेशिर्के यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन पेटंट मंजूर झाले आहे. या पेटंटचा नोंदणी क्रमांक 498790-001 असून, त्यांच्या या यशामुळे सह्याद्री पॉलिटेक्निकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामीण भागात तसेच शेतीच्या परिसरात वन्यप्राण्यांच्या वावरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाची समस्याही गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. हर्षला राजेशिर्के यांनी तांत्रिक उपाय शोधत ‘ॲनिमल डिटेक्शन अँड मॉनिटरिंग डिव्हाइस’ विकसित केले आहे. हे उपकरण शेत किंवा मानवी वस्तीच्या परिसरात वन्यप्राण्यांची उपस्थिती ओळखून सतर्कतेचा इशारा देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींची वेळेत माहिती मिळण्यास मदत होऊन पिकांचे नुकसान कमी करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि मानव-प्राणी संघर्ष टाळण्याच्या प्रयत्नांना बळ मिळू शकते.
संशोधन आणि बौद्धिक संपदा क्षेत्रातील या यशामुळे सह्याद्री पॉलिटेक्निकसह संपूर्ण परिसराची मान उंचावली आहे. समाजोपयोगी समस्येवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार शेखर निकम, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, प्राचार्य मंगेश भोसले, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्रा. हर्षला राजेशिर्के यांचे अभिनंदन केले. भविष्यातही त्यांच्या हातून अशाच नावीन्यपूर्ण आणि समाजोपयोगी संशोधनाची निर्मिती व्हावी, अशा शुभेच्छा सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी प्रा. हर्षला राजेशिर्के यांचा संस्थेचे संचालक हरिश्चंद्र सुर्वे, प्राचार्य मंगेश भोसले, विभागप्रमुख कबाडे आणि नामदेव गावडे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.




