फक्त व्हाईट कॉलर नोकऱ्याच नाही तर शेती-बांधकामासारखी कामेही रोबोट्स करणार? बिल गेट्स यांचा AI बाबत मोठा इशारा!

Bill Gates AI Warning : कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार होत आहे. आता एआय फक्त स्मार्टफोनपुरते मर्यादीत राहिले नाही, तर त्याने अनेक क्षेत्रात शिरकाव केला आहे.

AI आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेत आणि सामाजिक संरचनेत मोठे वादळ निर्माण करणार असल्याचा इशारा मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे. “सुरक्षेचे सर्व निकष पाळले गेले, तरीही पुढील २० वर्षांत मोठी उलथापालथ होऊ शकते. यामुळे लाखो रोजगार धोक्यात येतील, उद्योगांचे स्वरुप बदलेल आणि मानवी जीवनाच्या मूळ उद्देशालाच आव्हान निर्माण होईल” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

‘द व्हर्ज’च्या प्रसिद्ध ‘डीकोडर’ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांनी AI च्या धोक्यांवर आणि भविष्यातील शक्यतांवर आपले मत मांडले.

पुढील २० वर्षांचा काळ आव्हानात्मक – बिल गेट्स

मुलाखतीत बोलताना गेट्स म्हणाले, “माझी सर्वात मोठी चिंता आगामी २० वर्षांच्या संक्रमण काळाबद्दल आहे. या काळात काही लोक आणि कंपन्या यशस्वी होतील, तर अनेकांचे मोठे नुकसान होईल. समृद्धीच्या त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या कठीण काळातून जावेच लागेल.” ते पुढे म्हणाले की, कोडिंग, बायोलॉजिकल रिसर्च आणि गुंतागुंतीच्या कामांमध्ये AI ने अफाट प्रगती केली आहे. मात्र, यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक सरकारे आणि समाज पूर्णपणे तयार नाही.

व्हाईट कॉलर अन् ब्लू कॉलर… दोन्ही नोकऱ्यांना धोका!

AI मुळे होणाऱ्या नोकरकपातीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मानवी श्रमाची गरज वेगाने कमी होणार आहे. याचा पहिला फटका व्हाईट कॉलर नोकऱ्यांना बसणार आहे. अकाऊंटिंग, टेलिसेल्स आणि कस्टमर सपोर्ट यांसारख्या सेवांमध्ये AI कमी खर्चात, जलद आणि अचूक काम करत असल्याने या क्षेत्रांतील मानवी कौशल्यांची गरज संपेल.

आगामी दोन दशकांत मानवासारखे दिसणारे रोबोट्स बांधकाम, शेती, आरोग्य सेवा आणि शस्त्रक्रिया यांसारखी कठीण कामे सहज करू शकतील. त्यामुळे मानवी श्रमावर आधारित रोजगारही कमी होईल.

नजीकच्या काळातील मोठे धोके

केवळ नोकऱ्याच नाही तर एआयचा गैरवापर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ शकतो, अशी भीती गेट्स यांनी व्यक्त केली. सायबर हल्ले आणि जैविक शस्त्रांमध्ये AI चा वापर हे नजीकच्या काळातील सर्वात मोठे धोके असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, जिथे हे मानवी इतिहासातील आजवरचे सर्वात धोकादायक तंत्रज्ञान ठरले आहे. युद्ध लढण्याच्या पद्धतींवर याचा खोल परिणाम होईल, असा इशारा त्यांनी दिला. केवळ AI कंपन्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवणे चुकीचे ठरेल. जागतिक स्पर्धा वाढल्याने कंपन्या स्वतःहून बंधने पाळणार नाहीत. त्यामुळे सरकारने कठोर कायदे लागू केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केलं.

आरोग्य आणि शेती क्षेत्रात क्रांतीची संधी

एवढे धोके असूनही बिल गेट्स यांनी आपण सर्वकाही संपणार असे मानणारे नसल्याचे स्पष्ट केले. ‘गेट्स फाउंडेशन’च्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि आफ्रिकेतील शेती क्षेत्रात औषध शोध आणि हवामान अंदाजासाठी AI चा सकारात्मक वापर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button