
Jio IPO नं रचला इतिहास! १ कोटींहून अधिक अर्ज मिळवणारा जगातील पहिलाच आयपीओ ठरला; अनेक विक्रम मोडले!
Jio IPO : रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचार क्षेत्रातील कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या आयपीओसाठी तब्बल १ कोटी २० लाखांहून अधिक अर्ज मिळाले आहेत.
भारताच्या इतिहासात एखाद्या आयपीओसाठी मिळालेली ही सर्वाधिक अर्जांची संख्या असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, १ कोटींहून अधिक अर्ज मिळवणारा हा जगातील पहिलाच आयपीओ ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम वारी एनर्जीजच्या नावावर होता. या कंपनीच्या आयपीओला ९७ लाखांहून अधिक अर्ज मिळाले होते.
पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओला सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बुधवारी आयपीओ खुला झाल्यानंतर अवघ्या दोन तासांतच त्याचे पूर्ण सबस्क्रिप्शन झालं. पहिल्या दिवशी या आयपीओसाठी सुमारे ३०.५ लाख अर्ज आले होते. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस अर्जांची संख्या ७५ लाखांच्या पुढे गेली. तिसऱ्या दिवशी अर्जांची संख्या १ कोटींचा टप्पा ओलांडून गेली. अखेर शेवटच्या दिवशी हा आयपीओ २२ पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब झाला.
या आयपीओमध्ये १९.७५ कोटी शेअर्स उपलब्ध होते. मात्र, गुंतवणूकदारांकडून तब्बल ४३८ कोटी शेअर्ससाठी बोली लावण्यात आली. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (QIB) राखीव हिस्सा ७० पटींनी सबस्क्राइब झाला. अनलिस्टेड मार्केटमध्येही जिओच्या शेअर्सबाबत उत्साह कायम होता. आयपीओच्या शेवटच्या दिवशी ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सुमारे २१ टक्क्यांच्या आसपास होता.
२१ ऑक्टोबरला खुला झाला होता आयपीओ
जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ २१ ऑक्टोबर रोजी खुला झाला होता. यासाठी प्रति शेअर १,०६५ ते १,११९ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. एका लॉटमध्ये १२ शेअर्स ठेवण्यात आले होते. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीनं २७ कोटी नवीन शेअर्स जारी केले. कंपनीचं उद्दिष्ट ३०,२१३ कोटी रुपये उभारण्याचं होतं. या व्यवहारानंतर कंपनीचे मूल्यांकन सुमारे १०८ अब्ज डॉलर्स निश्चित करण्यात आले आहे. या आयपीओमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड किंवा कंपनीच्या अन्य विद्यमान भागधारकांनी त्यांचे शेअर्स विक्रीसाठी ठेवले नव्हते. संपूर्ण इश्यू नवीन शेअर्स जारी करण्याशी संबंधित होता.
संस्थात्मक गुंतवणूकदारांचाही मोठा प्रतिसाद
आयपीओ खुला होण्यापूर्वीच जिओ प्लॅटफॉर्म्सने मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम उभारली होती. १९ ऑक्टोबर रोजी कंपनीने २१२ अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे ८,११० कोटी रुपये मिळवले होते. या गुंतवणूकदारांना प्रति शेअर १,११९ रुपये या दराने शेअर्सचे वाटप करण्यात आलं. अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या हिस्स्यासाठी २.५ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बोली प्राप्त झाल्या. उपलब्ध वाटपाच्या तुलनेत ही मागणी ३० पटींपेक्षाही अधिक होती.
या गुंतवणूकदारांमध्ये ब्लॅकरॉक, फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स, जीआयसी आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांसारख्या जागतिक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि सॉवरेन वेल्थ फंडांचा समावेश होता.
पैशांचा वापर कशासाठी होणार?
जिओ प्लॅटफॉर्म्सनं आयपीओतून मिळणाऱ्या रकमेचा मोठा भाग कर्जफेडीसाठी वापरण्याची योजना आखली आहे. कंपनी आपल्या पूर्ण मालकीच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम या उपकंपनीचे कर्ज फेडण्यासाठी २७,५०० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम वापरणार आहे. उर्वरित रक्कम भांडवली खर्च आणि दैनंदिन व्यावसायिक कामकाजासाठी आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाणार आहे. एकूणच, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, विक्रमी अर्जसंख्या आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांची मोठी मागणी यामुळे या आयपीओने जागतिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.




