खारघरमध्ये युरोपियन रोलरचे प्रथमच दर्शन! डोंगररांगा आणि पाणथळीमुळे येथे विविध पक्ष्यांचा अधिवास!!

पनवेल : खारघरमधील सेक्टर १ येथे गेल्या आठवड्यात सात युरोपियन रोलर पक्षी एकाच वेळी दिसून आले. पक्षी अभ्यासक प्रदीप चौधरी यांनी या पक्ष्यांचे छायाचित्रण केले. खारघरमध्ये या पक्ष्याचे प्रथमच दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले. याच काळात सेक्टर ४ मध्ये हूपू (हुडहुड) पक्षी नेहमीपेक्षा अधिक संख्येने आढळले, तर दसऱ्याच्या काळात शुभ मानल्या जाणाऱ्या भारतीय नीलपंखाचेही दर्शन झाले.

खारघरला डोंगररांगा आणि पाणथळींचा परिसर जोडलेला असल्याने येथे विविध पक्ष्यांचा अधिवास आहे. आतापर्यंत या परिसरात १२५ दुर्मीळ पक्ष्यांची नोंद झाल्याची माहिती चौधरी यांनी दिली. युरोपियन रोलरचे सात पक्षी एकाच वेळी सेक्टर १ मध्ये दिसणे ही खारघरमधील पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची नोंद आहे. याशिवाय हुपू (युरेशियन हुडहुड) हा पक्षी दरवर्षी खारघरमध्ये येतो. यापूर्वी तो प्रामुख्याने सेक्टर १, १६ आणि २५ येथे दिसत होता. मात्र, यंदा सेक्टर ४ मध्येही तो मोठ्या संख्येने आढळला आहे. खारघरचे माजी उपसरपंच संजय घरत हे १३ ऑक्टोबरला सकाळी साडेआठच्या सूमारास बेलपाडा गावाजवळील भारती विद्यापीठाशेजारील मैदानात धावत असताना त्यांना या पक्ष्यांचा थवा दिसला. त्यानंतर १५ ऑक्टोबरला पक्षी अभ्यासक प्रदीप चौधरी यांना युरोपियन रोलर पक्षी दिसला.भारतीय नीलपंख हा पक्षी दरवर्षी ऑक्टोबरमध्ये खारघरमध्ये येतो आणि एप्रिलपर्यंत येथे आढळतो. सेक्टर १, ८, १७, २५ आणि ३५ परिसरात त्याचे दर्शन होते. सेक्टर १ मध्ये एकावेळी सुमारे पाच नीलपंख दिसतात. दसऱ्याच्या काळात या पक्ष्याचे दर्शन शुभ मानले जाते.

खारघरच्या डोंगराळ भागासह पाणथळींच्या परिसरात पक्ष्यांच्या विविध प्रजाती हजारो किलोमीटरचा प्रवास करून येथे खाद्यासाठी येत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या भागातील पक्ष्यांचे नियमित निरीक्षण आणि त्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम पक्षी अभ्यासकांकडून केले जात आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

सूतार पक्ष्याशी साधर्म्य

सूतारपक्षीप्रमाणे डोक्यावर टोकदार चोचीप्रमाणे हुडहुड पक्ष्याचा आकार असल्याने तो अनेकांना सूतारपक्षी वाटतो. मात्र हा हुडहुड हा पक्षी वेगळा असल्याचे पक्षी निरीक्षकांना स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button