पंखा-कुलरमधूनही गरम हवा! महाराष्ट्रात उकाडा कधी कमी होणार? थंडीबाबत हवामान तज्ज्ञांचा अंदाज!

El Nino Effect : घामाच्या धारा, अंगाची लाहीलाही आणि चिकचिक यामुळे प्रचंड चिडचिड होत आहे. उकाडा इतका वाढलाय की पंखा आणि कुलरमधूनही उष्ण हवा येऊ लागली आहे. पाणीही गार वाटेनासं झालं आहे. हा उकाडा नकोसा झाला आहे.

गुलाबी थंडी कधी पडणार याची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा थंडी कमी राहणार आहे. एल निनोमुळे भारतात उष्ण वातावरण राहील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे सुरुवातीचे दोन आठवडे अति उष्ण राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या खाडीत सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. आंध्र आणि तामिळनाडू या भागांना त्यांचा फटका पडणार आहे. दुसरा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात तयार झाला आहे. मात्र त्यामुळे हवामानात बदल होतील, मात्र चक्रीवादळाचा धोका भारताला बसेल अशी याची सध्यातरी कोणतीही शक्यता नाही. इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तरेकडे तयार झाले आहेत. त्यानंतर आता पुढचे काही दिवस वेस्टर्न डिस्टर्बन्स राहणार नाही.

यावेळी एल निनोमुळे थंडीचा कालावधी कमी होणार आहे. उष्ण वातावरण जास्त राहणार आहे. दक्षिणेत अति मुसळधार पाऊस तर उत्तरेकडे निरभ्र आकाश, सूर्यदेव आग ओकतोय अशी स्थिती महाराष्ट्रातही राहणार आहे. महाराष्ट्रात तळकोकण आणि घाटमाथ्याचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हवामान अति उष्ण आणि कोरडं राहणार आहे.

कोकण आणि घाटमाथ्यावर अगदी हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. एल निनो नोव्हेंबरमध्ये पिकवर असणार आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये 21 ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे स्थानिक हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे.

कोकणातील उर्वरित हवामानाचा विचार करता पावसाची स्थिती जिल्ह्यानुसार वेगळी राहू शकते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महाराष्ट्रासाठी अति उष्णण हवामान राहणार आहे. त्यानंतर जसा एल निनोचा इफेक्ट कमी होत जाईल तसं वातावरण सामान्य होईल. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अति उष्ण हवामान या आठवडाभरात राहणार आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 21 ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या विभागात पावसाची शक्यता प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरती मर्यादित राहणार असल्याचे दिलेल्या अंदाजावरून स्पष्ट होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button