
राज्यात पुन्हा पावसाच्या सरी, १२ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज!
राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका कायम असतानाच वातावरणात बदल होऊन पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
काल कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्याच्या उर्वरित भागांत उष्णता आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि लातूर, तसेच विदर्भातील नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
५ जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज
अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, राज्यातील अन्य भागांत उकाडा जाणवू शकतो. दिवसभर तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.




