
शाळकरी मुलांनी मनसोक्त जगावे, खेळावे, वाचावे; मोबाइल वापरावा दिवसातून फक्त पाच मिनिटे!
रत्नागिरी : ‘मोबाइलच्या आभासी जगात अडकून न पडता मनसोक्त खेळा, पुस्तके वाचा आणि आपले बालपण आनंदाने जगा. दिवसातून जास्तीत जास्त फक्त पाच मिनिटेच स्क्रीन बघा,’ असा सल्ला सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांनी विद्यार्थ्यांना दिला. मुलांच्या हाती मोबाइल देताना पालकांनीही सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले. शारदोत्सवानिमित्त भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात ते बोलत होते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारता मारता त्यांनी मोबाइलच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यानंतर उपस्थित पालकांशी संवाद साधून मुलांचा मोबाइल वापर, ऑनलाइन गेम्स आणि आर्थिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
मोबाइलच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येणे, लहान वयात चष्मा लागणे, मान व पाठ दुखणे, तसेच स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होणे अशा समस्या उद्भवू शकतात, असे डॉ. फाटक यांनी सोप्या उदाहरणांतून सांगितले. हेडफोन किंवा इयरफोनच्या वापरामुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते, असे सांगून लहान मुलांनी त्यांचा वापर टाळावा, असा सल्लाही त्यांनी दिला. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लगेच मोबाइलवर शोधण्याऐवजी पुस्तके वाचून ज्ञान मिळवण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावावी. अभ्यासासोबतच मैदानावर खेळण्याचा आनंद घ्यावा, असे त्यांनी सांगितले. मोबाइलपलीकडील जग अनुभवण्याचे आणि बालपण आनंदाने जगण्याचे महत्त्व त्यांनी संवादातून पटवून दिले. अंतर्मुख करणारे थेट प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रामाणिक उत्तरे दिली आणि मोबाइलचा वापर कमी करण्याचा शब्द दिला.
मुले ऑनलाइन गेम्स खेळताना त्यांच्याकडून होणाऱ्या चुका कुटुंबाला आर्थिक संकटात आणू शकतात, याकडे डॉ. फाटक यांनी लक्ष वेधले. पालकांच्या नकळत त्यांच्या खात्यातून लाखो रुपये हस्तांतरित होऊ शकतात आणि ही बाब त्यांच्या उशिरा लक्षात येऊ शकते. त्यामुळे मुलांनी पालकांचे पासवर्ड स्वतःजवळ ठेवू नयेत, तसेच पालकांनीही आर्थिक व्यवहारांची गोपनीय माहिती मुलांना देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकांशी झालेल्या संवादात डॉ. फाटक यांनी मोबाइलचा पासवर्ड आणि गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम यांसारख्या आर्थिक व्यवहारांच्या अॅप्सचे यूपीआय पासवर्ड मुलांसमोर वापरणे टाळण्याचा सल्ला दिला. मुलांना आर्थिक व्यवहार करण्याचे, तसेच मोबाइल वापरण्याचे अनियंत्रित स्वातंत्र्य देणे धोकादायक ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले. समाजमाध्यमे आणि डिजिटल आर्थिक व्यवहारांचा वापर अनेकांनी स्वतः शिकून घेतला आहे; मात्र त्यासोबत सुरक्षिततेचे नियमही जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या पैशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पालकांनी स्वतः स्वीकारावी. तसेच, मुले मोबाइलवर आणि ऑनलाइन काय करतात यावर लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुलांच्या मोबाइल वापरावर मर्यादा घालताना पालकांनी घरातील स्वतःचा मोबाइल वापरही मर्यादित ठेवून उदाहरण घालून द्यावे. मुलांच्या हातात विनाकारण मोबाइल सोपवणे टाळावे, असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी उपस्थितांच्या काही शंकांचे निरसन केले. तसेच अधिक मदतीसाठी आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शारदामातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी प्रास्ताविक केले आणि डॉ. अक्षय फाटक यांच्या कार्याची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षिका सौ. गुणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते.




