खेड बसस्थानकात मद्यधुंद तरुणाची एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण!

खेड-तिसंगी बसमध्ये वाहकाशी वाद घालत हल्ला; घटनेमुळे बसस्थानक परिसरात खळबळ

खेड : खेड बसस्थानकात मद्यधुंद तरुणाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. खेडहून तिसंगी येथे जाणाऱ्या एसटी बसमध्ये कर्तव्यावर असलेल्या चालकाला संबंधित तरुणाने वाद घालत त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. सहकाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच बसस्थानकातील अन्य एसटी कर्मचारी घटनास्थळी जमा झाले. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड बसस्थानकातून तिसंगीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका मद्यधुंद तरुणाचा वाहकाशी वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. कर्तव्य बजावत असलेल्या वाहकाला मारहाण झाल्याने बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संबंधित तरुणाला कर्मचाऱ्यांनी घेरल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित तरुणाकडून वाहकाला मारहाण करणाऱ्या तरुणाच्या कृत्याचा निषेध होत असतानाच, कर्मचाऱ्यांकडून झालेल्या कथित मारहाणीचीही चर्चा सुरू झाली आहे.
प्रवाशांची वाहतूक करताना एसटी चालक आणि वाहकांना अनेकदा वादविवादांना सामोरे जावे लागते. मात्र, कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांवर हात उचलण्याच्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. खेड बसस्थानकातील घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणात नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, तसेच घटनेदरम्यान पोलिसांनी काय भूमिका घेतली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button