
रत्नागिरीत ३५१ पाणी योजनांना बूस्टर डोस, पाण्यासाठीची वणवण थांबणार!
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पाऊस कमी पडल्याने भीषण पाणी टंचाईचे गडद सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील जनतेला आणि विशेषतः महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबविण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ज्या नळ पाणीपुरवठा योजनांचे काम तब्बल ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे, अशा योजना तातडीने पूर्ण करून त्या कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या संयुक्त पुढाकारातून हा महत्त्वाचा मार्ग काढण्यात आला असून, १५ व्या वित्त आयोगातील उपलब्ध निधीतून या योजनांना अखेरचा हातभार लावला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन (२०२५-२६) अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाने शुद्ध पाणी पोहोचविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात नियोजित १४३२ पाणी योजनांपैकी १४२८ योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी ५९० योजनांचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, जिल्ह्याची एकूण सरासरी प्रगती ४१.३२ टक्के इतकी नोंदवली गेली आहे. यामध्ये लांजा आणि मंडणगड तालुक्यांनी कामात आघाडी घेतली आहे, तर गुहागर तालुक्यात मात्र कामाची गती मंद असल्याचे दिसून येते.
सध्या जिल्ह्यात ३५१ योजना अशा आहेत ज्यांचे काम अगदी अंतिम टप्प्यात म्हणजेच ७५ ते १०० टक्के पूर्ण झाले आहे. या योजना किरकोळ कामांमुळे रखडू नयेत म्हणून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक योजनेवर २ ते ५ लाख रुपयांपर्यंतचा आवश्यक खर्च करून त्या तातडीने सुरू करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. याव्यतिरिक्त ३०३ योजनांचे काम ५० ते ७५ टक्के, १२४ योजनांचे काम २५ ते ५० टक्के आणि ४५ योजनांचे काम २५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे.




