
खासगी बसमधून ६४ हजारांचा आयफोन लंपास
मुंबईहून रत्नागिरीकडे जाणार्या खासगी बसमधून प्रवास करणार्या एका प्रवाशाचा ६४ हजार रुपये किमतीचा आयफोन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. १० ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर एसटी बसस्थानक परिसरात हा प्रकार समोर आला. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रवींद्र दिनकर वैद्य (५४, रा. बोरिवली पश्चिम, मुंबई) हे ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विलेपार्ले येथून साई टॅव्हल्सच्या खासगी बसने रत्नागिरीकडे जाण्यासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान पेण येथे ते स्वच्छतागृहासाठी बसमधून खाली उतरले होते. त्यानंतर त्यांनी आपला ऍपल आयफोन १५, ज्याची किंमत ६४ हजार रुपये आहे, तो बसमधील स्लीपर सीटवर डाव्या बाजूला ठेवला होता.
१० ऑक्टोबर रोजी पहाटे संगमेश्वर एसटी बसस्थानक येथे बस पोहोचल्यानंतर वैद्य यांना जाग आली. त्यावेळी त्यांनी आसनावर ठेवलेला मोबाईल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.




