
रत्नागिरीत रॅम्प, स्विमिंग पूलच्या नळजोडण्या बंद होणार
रत्नागिरी : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून गाड्या धुण्याचे रॅम्प आणि स्विमिंग पूल यांच्या नळजोडण्या तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत. नगर परिषदेचे पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पाण्याचा अधिक वापर होणाऱ्या ठिकाणी बचतीचे उपाय राबविण्यात येणार असून, संबंधित व्यावसायिकांना याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच, रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि गृहनिर्माण सोसायट्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे नायर यांनी सांगितले.
नागरिकांना पाणीटंचाईची झळ कमी बसावी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




