
रत्नागिरी तालुक्यात ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा
रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत रत्नागिरी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शामराव पेजे सभागृह, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेला रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती मा. प्रवीणजी पांचाळ, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऍड सुयोग कांबळे, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि गटविकास अधिकारी मा. चेतन शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यही या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.
गावपातळीवर आरोग्यविषयक सुविधा अधिक प्रभावी करणे, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे, माता व बाल आरोग्य, पोषण, स्वच्छता, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध आणि नियमित आरोग्य तपासणी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयातून गावांचा आरोग्यविषयक दर्जा उंचावणे, लोकसहभाग वाढविणे आणि प्रत्येक गावासाठी आरोग्यविषयक कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेला विशेष महत्त्व आहे.
‘निरोगी नागरिक, सुदृढ कुटुंब आणि आरोग्य संपन्न गाव’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर कार्यशाळेत भर देण्यात येणार आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे व संपूर्ण तालुक्यातील आरोग्य अधिकारी कर्मचारी या कार्यशाळेची तयारी करत आहेत



