
महाराष्ट्रातील ४३.१६ लाख विद्यार्थ्यांच्या ‘आधार’ अद्ययावतीकरणची रखडपट्टी!
अकोला : आधारमधील ‘बायोमेट्रिक रेकॉर्ड’ अद्ययावत ठेवण्यासह विविध सरकारी योजना, शिष्यवृत्तीचे लाभ, प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करताना पडताळणीत येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे ‘बायोमेट्रिक’ अद्ययावतीकरण आवश्यक आहे. राज्यातील ४३.१६ लाख विद्यार्थ्यांचे ‘आधार’ अद्ययावतीकरण प्रलंबित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ते पूर्ण न केल्यास लाभापासून वंचित राहण्यासह आधार कार्डच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पाच वर्ष पूर्ण होताच ‘एमबीयू’ची सक्ती; १५ वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा ‘बायोमेट्रिक’
आधार पोर्टलनुसार, सध्या महाराष्ट्रात सुमारे ४३.१६ लाख आणि गोव्यात सुमारे ६७ हजार ५०० मुलांचे ‘बायोमेट्रिक अपडेट’ प्रलंबित आहे. त्यामुळे ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही ‘बायोमेट्रिक अपडेट’ची सुविधा ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. मुलाचे, मुलीचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिले ‘मॅंडेटरी बायोमेट्रिक अपडेट’ म्हणजेच एमबीयू करणे आवश्यक असते. त्यानंतर वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा ‘बायोमेट्रिक’ माहिती अपडेट करावी लागते. या दोन्ही टप्प्यांवर एमबीयू वेळेत पूर्ण करणे पालकांसाठी महत्त्वाचे आहे.
वाढत्या वयानुसार मुलांचे हातांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र
वाढत्या वयानुसार मुलांचे हातांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र आधारमध्ये नोंदवले जाते. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित विविध सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊन आधार कार्ड रद्द देखील केले जाऊ शकते. लहान मुलांसाठी आधार क्रमांक अतिशय महत्त्वाचा असून शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती, शाळेतील नोंदणी, तसेच विविध योजनांचा लाभ घेताना आधारचा वापर होत असल्याने पालकांनी मुलाचे आधार कार्ड काढण्याबरोबरच वेळोवेळी त्यातील माहिती अद्ययावत ठेवून आधारचे वेळोवेळी अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे.
अधिकृत आधार सेवांद्वारे आधारची सद्यस्थिती तपासली जाणार
पालकांनी आपल्या मुलाच्या आधारची सद्यस्थिती अधिकृत आधार सेवांद्वारे तपासता येणार आहे. एमबीयू प्रलंबित असल्यास संबंधित आधार केंद्रावर जाऊन ‘अपडेट’ची आवश्यकता आहे का, याची खात्री करता येते. आधार क्रमांकाची स्थिती तपासल्यानंतर आवश्यक असल्यास तातडीने एमबीयू पूर्ण करणे गरजेचे आहे. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. दरम्यान, वाशीम जिल्हातील एकूण एमबीयू पूर्ण करण्याचे नियोजन शाळेतच विशेष शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचा लाभ घेऊन पालकांनी आपल्या मुलांचे एमबीयू पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.




