
राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह प्रमुख नेते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; ९ तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर कारवाई!
Rahul Gandhi, Priyanka Gandhi Detained by Delhi Police : निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर धडक देण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधकांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह विरोधकांनी आकाशवाणी भवनाबाहेर तब्बल नऊ तास ठिय्या आंदोलन केले होते. रात्री पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांना ताब्यात घेत विविध पोलीस ठाण्यांमध्ये हलवले.
कथित ‘एसआयआर’ अनियमिततेच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भेटीची मागणी विरोधक करत होते. मंगळवारी सकाळपासूनच विरोधी पक्षांचे नेते आणि खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने कूच करत असताना पोलिसांनी त्यांना आकाशवाणी भवनाजवळ बॅरिकेड्स लावून रोखले. यावेळी संतप्त नेत्यांनी बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी केली. मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांनी कशी ‘मते चोरली’ हे प्रत्यक्ष सांगणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा विरोधी नेत्यांनी घेतला होता.
आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी काही समर्थकांसह आकाशवाणी भवनाच्या आवारात शिरले. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांच्यासह अनेक कार्यकर्तेही रात्रीपर्यंत तेथे उपस्थित होते. अखेर रात्री पोलिसांनी कारवाई करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी, डेरेक ओ’ब्रायन, इम्रान मसूद, पी. संतोष आणि ए. रहीम यांच्यासह अनेक खासदारांना बसमधून विविध पोलीस ठाण्यांत नेले.
‘पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी लोकशाही संपवली’, राहुल गांधी
आकाशवाणी भवनाच्या आवारातून पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर थेट टीका केली. ‘भाजपा काय म्हणते यात मला रस नाही; आम्ही केवळ त्यांना विरोध करत नसून देशातील लोकशाही वाचवण्यासाठी उभे आहोत,’ असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मिळून देशातील लोकशाही संपुष्टात आणली असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘देशातील तरुणांना आता हे सर्व उमगले आहे. त्यांनी उघडपणे मतचोरी करून निवडणुका हायजॅक केल्या आहेत,’ असा दावाही गांधी यांनी यावेळी केला.
सर्व काही लक्षात ठेवले जाईल
राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतानाचा एक व्हिडीओ काँग्रेसच्या एक्स खात्यावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये ‘सर्व काही लक्षात ठेवले जाईल’ असे कॅप्शन लिहिण्यात आले आहे.




