
दापोलीतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत आपण सदैव जनतेसोबत-खासदार सुनिल तटकरे

दापोलीः- कोकणामध्ये रासायनिक प्रकल्प हे कोणत्याही परिस्थितीत होऊ नये ही आपली यापूर्वाही भूमिका होती, आजही आहे व उद्याही राहिल असे सांगतानाच दापोलीत होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला आपण जनतेसोबत ठाम आहोत, असे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.
दापोली शहरातील फाटक कॅपिटल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, यापूर्वा कोकणामध्ये विविध रासायनिक प्रकल्प आले या प्रकल्पाचे परिणाम आपण आज भोगत आहोत. त्यामुळे रासायनिक प्रकल्प येऊ नयेत अशीच आपली भूमिका आहे. व यासाठी आपण सदैव जनतेसोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दापोली तालुका हा निसर्ग संपन्नतेने नटलेला तालुका आहे. या तालुक्यामध्ये पर्यटनाला मोठया प्रमाणात वाव आहे. त्यामुळे पर्यटनांमध्ये या तालुक्यात उद्योग यावेत अशी आपली भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दापोली तालुक्यात अनेक वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठया प्रमाणात पक्षप्रवेश झाले असून हा आलेख यापुढील काळात मोठया प्रमाणात वाढत असलेला आपल्याला दिसून येईल. असे त्यांनी सांगितले.
दापोली शहरामध्ये गाजत असलेल्या वक्फ जमिनीच्या प्रश्नाबाबत बोलताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, आपल्याला या विषयाची पूर्ण माहिती नाही. आपण जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्नाबाबत लक्ष घालण्यास सांगितले असून वक्फ बाबत संसदेमध्ये विविध कायदे बदलले असून या कायद्याच्या चौकटीत हा व्यवहार बसतो की नाही हे यापुढील काळात स्पष्ट होईल, असे सांगतानाच अन्य नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण काय बोलणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आगामी ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकीबाबत राष्ट्रवादीची भूमिका विचारली असता खासदार तटकरे म्हणाले की, देश व राज्य पातळीवर महायुतीचा धर्म पाळला जात आहे. स्थानिक निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा अशी पक्षाची भूमिका असते व पक्ष वाढीचा प्रयत्न याच निवडणुकीच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे या निवडणुकीत मित्रपक्षांजवळ युती होईल की नाही हे त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरवता येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्याच्यासमवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, ज्येष्ठ नेते दौलतराव पोस्टुरे, अजय बिरवटकर, महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर, प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, महिला जिल्हा सरचिटणीस रमा बेलोसे, माजी नगराध्यक्ष विनिता शिगवण, शहराध्यक्ष नितीन मयेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
फोटो डिपी 05-05 दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भूमिका व्यक्त करताना खासदार सुनिल तटकरे




