अमित शाह यांनी स्वतःचा पक्ष जिंकावा म्हणून पश्चिम बंगालमध्ये एका महिलेविरोधात फौज घुसवली- उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका


मुंबईत आज ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चात मोठी गर्दी उसळली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खणखणीत भाषणानंतर सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकेचा मोर्चा उघडला. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर त्यांनी झंझावाती भाषण केले.
या भाषणातून त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पश्चिम बंगालचे सरकार आणि कथित अंधभक्तांविरोधात मोर्चा उघडला. भाषणाच्या गोफणीतून अनेक शा‍ब्दिक फटकारे त्यांनी लगावले. त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना मोठा इशाराही दिला.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आणि संपूर्ण हैदराबाद संस्थान देशात सामील करण्यासाठी भारतीय फौजा घुसवल्या होत्या. पण आता अमित शाह यांनी स्वतःचा पक्ष जिंकावा म्हणून पश्चिम बंगालमध्ये एका महिलेविरोधात फौज घुसवली अशी घणाघाती टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगाचे आयुक्त नियुक्त करणाऱ्या समितीत सरन्यायाधीशांना हटवून अमित शाह यांना घेण्यात आले. त्यांनी ज्ञानेश कुमार यांची बेकायदेशीर नियुक्ती केली असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच हल्लाबोल केला.

ही तुमची लोकशाही? म्हणून बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की अशी लोकशाही गाडायला पाहिजे. ते दळभद्री लोकशाही, हुकूमशाहीविरोधात बोलत होते. मी तमाम अंध भक्तांना सांगतो, ते चॅनलच्या माध्यमातून आले असतील. अथवा इथंही कुठं तरी असतील. माझं काय जातंय असं त्यांना वाटतं असेल तर तुझंही जातंय असं मला त्यांना सांगायचंय. माझी नजर पुरत नाही तिथपर्यंतच्या या लोकांना हे कळलं आहे. जे मागे अनेकदा बोललो होतो की प्रशासन आणि भाजप या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. भाजपला सरकार चालवता येत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही सरकार चालवत आहात, ते सूड उगवणे आहे. काल ठाण्यात आमच्या पूर्णेकरांची हत्या झाली. पोलीस काय करतायेत, कुठे आहेत गृहमंत्री, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

देशभर महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतं आहेत. कुठे तुमचं हिंदुत्ववादी सरकार, हे तुमचं हिंदुत्व आहे का? आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. शेतीवर अवलंबून असलेला अन्नदाता याच्यावर जी परिस्थिती ओढावली, त्याचे आपण कल्पना करू शकत नाही. यांना शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही. यांना एकच उद्योग आहे. ते पक्ष फोडत आहेत. यांनी कसल्या कसल्या चोऱ्या केल्या आहेत. वोट चोरी केली. राम मंदिरातील दानपेटीही चोरली. पक्ष चोराने तुम्ही षंढ आहात. 45 लाख मतदार वाढवले. ज्ञानेश कुमार हे त्यांचे हत्यार आहे. आता मताधिकाराचा हक्क ही त्यांनी चोरला आहे. तुम्ही मत चोरी केली असेल. पण त्यांच्या अजून एक गोष्ट लक्षात आलेली नाही. तुम्ही न्यायसंस्था ताब्यात घेतली असेल. प्रशासन तुम्ही ताब्यात घेतली असेल. हे रस्ते जनतेच्या मालिकेचे आहेत. या रस्त्यावर फिरणं तुम्हाला जिकरीचं होईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button