रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू


आळंदीहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; सर्व मृतदेह बाहेर काढले


रायगड : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (१ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या सहलीसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत विद्यार्थ्यांपैकी सर्वजण अकरावीतील असल्याचे समोर आले आहे.

विनर्स अकॅडमीचे ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक, असे एकूण ४४ जण सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्रकिनारी गेल्यानंतर काही विद्यार्थी पोहोण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी पाण्यात ओढले गेले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनीही बचावकार्यात मदत केली. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्व ८ विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून ते बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनी प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेतला. आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

या दुर्घटनेमुळे दिवेआगर परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्घटनेचे नेमके कारण आणि इतर बाबींचा प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांची नावे

  1. राजवीर वाहिले
  2. सोहम भांडवळकर
  3. कौस्तुभ दोंड
  4. यश वानखेडे
  5. कैवल्य वासंकर
  6. तन्मय वाहिले
  7. सुमित अहिरे
  8. प्रणव बनसोडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button