
लाखोंची घंटागाडी धूळ खात; केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा
तीन वर्षांपासून ग्रामपंचायत आवारात वाहन बंद; रस्त्याच्या कडेला कचरा, ओढ्यांमध्ये घाण अन् भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
राजापूर : स्वच्छतेसाठी शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली ओझोन घंटागाडी गेल्या तीन वर्षांपासून केळवली ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात धूळ खात उभी असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वच्छतेसाठी वाहन उपलब्ध असतानाही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याने गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत नागरी सुविधा विशेष अनुदानातून ही घंटागाडी खरेदी करण्यात आली. मात्र, खरेदी करून तीन वर्षांचा कालावधी उलटत असतानाही वाहनाचा अपेक्षित वापर होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीतून खर्च करण्यात आलेल्या लाखो रुपयांचा नेमका उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, केळवली ग्रामपंचायत हद्दीत काही ठिकाणी रस्त्यांच्या कडेला कचरा टाकला जात असून, काही कोंबडी व्यावसायिकांकडून व्यवसायातून निर्माण होणारी घाण परिसरातील ओढ्यांमध्ये टाकली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ओढ्यांमध्ये कचरा व घाण साचून दुर्गंधी पसरत आहे.
या अस्वच्छतेमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, महिला तसेच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
एकीकडे स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करून घंटागाडी खरेदी करण्यात आली, तर दुसरीकडे तीच घंटागाडी ग्रामपंचायत आवारात वापराविना उभी आहे. दीर्घकाळ वाहन वापरात नसल्याने त्याची झीज होण्याची शक्यता असून, सार्वजनिक निधीच्या वापराबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
घंटागाडी तातडीने सुरू करण्याची मागणी
गावातील कचरा संकलनासाठी घंटागाडीचा नियमित वापर सुरू करावा, रस्त्याच्या कडेला व ओढ्यांमध्ये साचलेल्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी, कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करावी आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच शासनाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेली घंटागाडी तीन वर्षांपासून वापराविना का पडून आहे, याची चौकशी करून संबंधित यंत्रणेने जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे.




