
खेड तालुक्यात आतापर्यंत ८० टक्के अधिक पाऊस
खेड : तालुक्यात यंदाच्या मान्सून हंगामात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे ७५ ते ८० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पेरण्या लांबल्या होत्या. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये तालुक्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या खेड तालुक्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची नोंद सुमारे ३ हजार ८४८ मि.मी. असल्याचे सांगण्यात येते. यंदा सुरुवातीला पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महसूल मंडलनिहाय विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे तालुक्यातील मुख्य तसेच मध्यम जलसाठ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून अनेक जलसाठे क्षमतेने भरले आहेत.
मुबलक पाणीसाठ्यामुळे आगामी काळात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाच्या काही सरी बरसल्यास तालुक्याची वार्षिक सरासरी सहज ओलांडली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.




