
जिल्ह्यासह चिपळुणात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ ताप-सर्दीनेही ग्रामस्थ हैराण
गेल्या काही दिवसांपासून चिपळूण शहरासह तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. डेंग्यूची लागण झालेल्या काही रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातही ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी/मारली आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्याप्रमाणात बदल झाला असून उन्हामुळे उष्माही वाढला आहे. त्यातच अधूनमधून पावसाच्या किरकोळ सरी कोसळत असल्याने वातावरणात दमटपणा कायम आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून विविध आजारांचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.
शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत.
डेंग्यूमुळे रुग्णांच्या रक्तातील पेशीची संख्या कमी होत असल्याने अनेक रुग्ण उपचारासाठी मोठ्या खासगी रुग्णालयांचा आधार घेत आहेत. उपचारानंतर रुग्ण बरे होत असले तरी डेंग्यूचा फैलाव अधिक वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.




