
गर्दीचा फायदा घेत ‘रत्नागिरीच्या राजा’च्या मंडपातून चांदीचे ताम्हण लंपास!
सत्यनारायण पूजेवेळी ४० हजारांच्या चांदीच्या ताम्हणावर चोरट्याची हातसफाई; शहर पोलिसांत गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे विराजमान असलेल्या ‘श्री रत्नागिरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून भरदिवसा सुमारे ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे ताम्हण चोरीला गेल्याची घटना बुधवारी घडली. सत्यनारायण पूजेच्या वेळी मंडपात झालेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ताम्हणावर हातसफाई केल्याचा संशय आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शंखेश्वर मधुबन, बोर्डिंग रोड, माळनाका येथील अमरेश सुरेश पावसकर (४४) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुधवारी सकाळी ‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी धार्मिक विधी सुरू असताना पूजेच्या साहित्यामध्ये सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे ताम्हण ठेवण्यात आले होते.
पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी मंडपात झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोणाच्याही लक्षात न येता ताम्हण लंपास केले. पूजेदरम्यान ताम्हण जागेवर नसल्याचे लक्षात येताच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह भाविकांमध्ये खळबळ उडाली.
ताम्हणाचा मंडप परिसरात तसेच आजूबाजूला शोध घेण्यात आला; मात्र ते मिळून आले नाही. अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी शहर पोलीस तपास करत आहेत.




