
“ज्ञानेश कुमार यांच्या बाजूने बहुमत नाही, SIR प्रक्रिया थांबवा”; कपिल सिब्बल यांचं मोठं वक्तव्य!
Special in-depth review : गेल्या काही दिवसांपासून देशभरात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील पात्रतेची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या घडामोडी दरम्यानच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
विशेष सखोल मतदार पडताळणी (SIR), मतदान यंत्रे यासह आदी काही मुद्द्यांवरून केंद्रीय निवडणूक आयोगातच फूट पडल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. विरोध डावलून किंवा मत विचारात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निर्णय घेतल्याची तक्रार तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
निवडणूक आयोगातील या घडामोडींवर अनेक राजकीय नेते मंडळीच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर ज्येष्ठ विधिज्ञ तथा राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनीही प्रतिक्रिया देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या बाजूने बहुमत नसल्याचा दावा करत एसआयआरची प्रक्रिया थांबवण्याची मागणी सिब्बल यांनी केली. या संदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.
कपिल सिब्बल यांनी काय म्हटलं?
‘तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला केवळ एकच निवडणूक आयुक्त होते. मात्र, त्यानंतर घटनादुरुस्ती करत राज्यघटनेच्या कलम ३२४ अन्वये निवडणुकांशी संबंधित बाबींवर निर्णय घेण्यासाठी ३ निवडणूक आयुक्तांची तरतूद करण्यात आली. निवडणूक आयोगाचे निर्णय हे बहुमताने घेतलं जाणं महत्वाचं आहे. पण आता अशी माहिती समोर आली की २५ जून २०२५ नंतरचे बहुतांश निर्णय बहुमताने घेण्यात आलेले नाहीत. उलट तीनपैकी दोन निवडणूक आयुक्तांनी म्हणजेच जोशी आणि संधू यांनी आक्षेप नोंदवूनही हे निर्णय घेतले गेले’, असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला.
VIDEO | Delhi: Rajya Sabha MP Kapil Sibal, says, “As you know, originally there was only one Election Commissioner but then through a constitutional amendment or through amendment of the law, three Election Commissioners were to be were to decide matters in respect of elections… pic.twitter.com/bvjfPONRAG
— Press Trust of India (@PTI_News) September 23, 2026
‘मुख्य निवडणूक आयुक्तांनी मनमानीपणे निर्णय घेतले’ : सिब्बल
‘मुख्य निवडणूक आयुक्त इतर दोन सदस्यांशी कोणतीही चर्चा न करता किंवा त्यांना विचारात न घेता मनमानीपणे निर्णय घेतले, हे निवडणूक आयोगाच्या नियमांच्या विरोधात आहे. यातील अनेक निर्णयांचा परिणाम निवडणूक प्रक्रियेत झाला, याचं श्रेय मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलं जाऊ शकतं’, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
‘मला या देशातील जनतेला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, जर निर्णय निवडणूक आयोगाच्या बहुमताने घेतले गेले नसतील, तर तो आयोगाचा अधिकृत निर्णय मानला जाऊ शकत नाही. त्यामुळे आयोगाच्या बहुमताचा विचार न करता आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णय अवैध आणि रद्दबातल घोषित करण्यात यावेत’, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.
‘आज समोर आलेल्या एका बातमीतून हे स्पष्ट झालं आहे की ज्ञानेश कुमार यांच्या बाजूने बहुमत नाही. ज्ञानेश कुमार हे त्यांच्या मनमर्जीने वागत आहेत किंवा निर्णय घेत आहेत. कशा पद्धतीने निवडणुका घ्यायच्या? कोणता अर्ज भरायचा हे ते ठरवत होते. माझ्या माहितीनुसार, निवडणूक आयुक्त जोशी आणि संधू यांनी १४ वेळा ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयाला विरोध केला होता’, असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला.




