
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग..’प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या गणेशोत्सवात अवतरली पंढरी: मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांना भक्तीच्या सुरांनी उजळवणारा एक भावस्पर्शी सोहळा
रत्नागिरी, दि,२० ) – भिंतींना बंदिस्त असलेल्या, स्वतःच्याच विस्कटलेल्या विश्वात हरवलेल्या जीवांच्या कंठातून जेव्हा आर्त आळवणी उमटते, तेव्हा ईश्वरालाही पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. ‘टाळ बोले चिपळीला.. नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग…’ हे शब्द कानावर पडत असताना तिथले वातावरण केवळ संगीतमय नव्हते, तर ते एका अलौकिक मुक्तीच्या आनंदाने भरून गेले होते. निमित्त होते जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकसंवाद कार्यक्रमाचे; पण औचित्य ठरले ते मनोरुग्णालयाच्या शांत आवारात भक्तीचा मळा फुलवणाऱ्या एका हृदयस्पर्शी साक्षात्काराचे.
ज्या जगाने त्यांना अनेकदा दुर्लक्षित केले, त्या जगाला विसरून या उपचारार्थींनी जेव्हा टाळ-मृदंगाच्या तालावर सूर छेडले, तेव्हा उपस्थित भारावले. संत तुकडोजी महाराजांच्या ‘प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी, पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा राहतो उपाशी…’ या अभंगातून उमटलेला आर्त सवाल उपस्थित सुजाण समाजाच्या थेट काळजाला भिडला. विषमतेच्या आणि स्वतःच्या नशिबाच्या खेळावर त्यांनी सुरांच्या माध्यमातून विचारलेला हा प्रश्न प्रत्येकाला अंतर्मुख करणारा ठरला.
त्यानंतर जेव्हा ‘देव माझा विठू सावळा..माळ त्याची माझिया गळा, विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, कशाला जाता दूर घरातच पंढरपूर…’ हे भक्तिगीत वातावरणात घुमले, तेव्हा जणू साक्षात विठ्ठलानेच त्या चार भिंतींच्या आत पाय ठेवल्याचा भास झाला. केवळ अभंगच नव्हे, तर ‘अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची…’ या गणरायाच्या वंदनेवर थिरकणाऱ्या त्यांच्या पावलांनी सिद्ध केले की, मनावर कितीही आघात झाले तरी आत्म्यातील कला आणि आनंद कधीही कोमेजत नाही.
हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता; तर तो वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरिणाक्षी गोसावी आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय चमूच्या अथांग मायेचा आणि विश्वासाचा विजय होता. ज्यांना रुग्ण मानले जात होते, त्यांनी स्वतःच्या कलेने क्षणात कलाकाराचे रूप धारण करून उपस्थितांना भारावून टाकले. औषधांपेक्षाही अधिक गुणकारी ठरणाऱ्या, विस्कटलेल्या मनांना मायेने पुन्हा कसे सांधता येते, याची साक्ष त्या क्षणी साऱ्यांनी अनुभवली.
त्या दिवशी मनोरुग्णालयाच्या त्या शांत प्रांगणात कोणताही भेद उरला नव्हता. ना रंक होता, ना राव. उरला होता फक्त भक्तीचा निखळ झरा, मनांचे मोकळे आकाश आणि सुरांच्या पावसात स्वतःला पूर्णपणे विसरून नाचणारे विठ्ठलाचे लाडके वारकरी.




