
लालबागमधील काळाचौकी येथील महागणपती मंडपाबाहेर शॉक लागून दोघींचा मृत्यू, पोलिसांचा स्टॉल चालकाला दणका
लालबागमधील काळाचौकी येथील प्रसिद्ध महागणपतीच्या मंडपाजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा जोरदार धक्का लागल्याने एका ८ वर्षांच्या बालिकेसह २ गणेशभक्तांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. रविवारी मध्यरात्री २.२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. येथील प्रसिद्ध महागणपतीच्या दर्शन रांगेजवळ एका स्टॉलमधून लागलेल्या वीजेच्या धक्क्याने एका आठ वर्षांच्या चिमुकलीसह ३३ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी स्टॉल चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पहाटेच्या सुमारास घडली दुर्घटना
रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास दत्ताराम लाड मार्गावरील आस्था रुग्णालयाजवळ ही घटना घडली. गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली असताना, तेथील एका स्टॉलवर असलेली वायर सैल झाल्यामुळे परिसरात वीज प्रवाह पसरला. या सैल तारेचा स्पर्श झाल्याने एकाच वेळी अनेक भाविकांना विजेचा जोरदार धक्का बसला.अनेकांना विजेचा धक्का लागल्याने परिसरात एकाच वेळी मोठा गोंधळ उडाला. या दुर्घटनेत रागिणी नावाची आठ वर्षांची चिमुकली आणि सुजाता थोराती (वय ३३) या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी रागिणीला तात्काळ मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर सुजाता थोराती यांचा ग्लोबल रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत आणखी चार भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वीज प्रवाहाची ही दुर्घटना स्टॉल चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्टॉल चालक कमल शेट्टी याच्याविरोधात दणका देत गुन्हा दाखल केला आहे.
कमल शेट्टी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६(१) आणि कलम १२५(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काळाचौकी पोलीस या दुर्घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.




